(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shekhar Suman : शेखर सुमनने मुलाच्या निधनानंतर घराबाहेर फेकलेल्या देवाच्या मुर्त्या; मंदिरात जाणंही केलं बंद
Shekhar Suman Story : शेखर सुमनचा मुलगा आयुषला हृदयाचा त्रास होता. मुलाच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी अभिनेता देवाकडे प्रार्थना करत असे. देवाकडे प्रार्थना करुनही शेखरच्या मुलाचं निधन झाल्याने श्रद्धेवरुन त्याचा विश्वास उडाला.
Shekhar Suman Story : बॉलिवूड अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) सध्या 'हीरामंडी' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतीच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. संजय लीला भन्साळीच्या या सीरिजमध्ये अभिनेत्याने जुल्फिकारची भूमिका साकारली आहे. तसेच मनीषा कोइराला दिलेल्या इंटीमेट सीनमुळे तो चर्चेत आहे. तसेच अभिनेत्याने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. शेखर सुमन आज चांगलाच लोकप्रिय आहे. आज या लोकप्रियतेचा त्याला आनंद वाटत असला तरी एकेकाळी त्याने अनेक गोष्टींचा सामना केला आहे. अभिनेत्याने आपल्या 11 वर्षीय मुलाला गमावलं आहे. त्याच्या आयुष्यातली ही सर्वात वाईट वेळ होती. मुलाला जमावल्यानंतर त्याचा देवावरचा विश्वास उडाला. तसेच घरातील मंदिराचे दरवाजेदेखील त्याने बंद केले.
कनेक्ट एफएम कनाडाला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमनने आपला दिवंगत मुलगा आयुषची आठवण काढली. मुलाला गंभीर आजार झाल्यानंतर तो बरा व्हावा यासाठी शेखर सुमन यांनी काय काय केलं हे त्यांनी सांगितलं आहे. लाखो प्रयत्न करुनही मुलाचा जीव गेला तेव्हा शेखर सुमन यांचा देवावरचा विश्वास उडाला.
...अन् देवावरचा विश्वास उडाला
शेखर सुमन म्हणाला,"मुलाच्या निधनानंतर माझा देवावरचा विश्वास उडाला. त्यावेळी देवाच्या सर्व मूर्त्या मी घराबाहेर फेकून दिल्या. मंदिरात जाणंदेखील बंद केलं. ज्या देवाने आपल्याला दु:खं दिलं त्याच्याकडे पुन्हा कधीही जायचं नाही, असा मी निर्णय घेतला. देवाने मला दु:खी केलं, एका गोड, लहानग्या मुलाला त्याने आपल्याकडे बोलावलं".
मुलाच्या आयुष्यासाठी देवाकडे केलेली प्रार्थना
शेखर सुमन याचा मोठा मुलगा आयुषला हृदयाचा गंभीर आजार झाला होता. मुलाच्या उपचारासाठी ते लंडनलाही गेले होते. मंदिरात जाऊन त्याने देवाकडे प्रार्थना केली. पण तरीही मुलाचं निधन झालं आणि अभिनेत्याचा देवावर असलेला विश्वास उडाला.
'हीरामंडी'मुळे शेखर सुमन चर्चेत! (Heeramandi Web Series Details)
अभिनेता शेखर सुमन सध्या आपल्या हीरामंडी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज झाली आहे. या सीरिजमधील शेखर सुमनच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. या सीरिजमध्ये शेखर सुमनसोबत त्याचा मुलगा अध्य्यन सुमनदेखील दिसत आहे. तसेच सोनाक्षी सिन्हा, ऋचा चड्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, फरीदा जलाल आणि फरदीन खान महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'हीरामंडी'नंतर शेखर सुमनच्या आगामी चित्रपटांची आणि वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. शेखर सुमन सध्या राजकारणात सक्रीय आहे.
संबंधित बातम्या