Pathaan OTT Release: ओटीटी रिलीजपूर्वी 'पठाण'च्या निर्मात्यांना करावे लागणार 'हे' बदल; दिल्ली हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश
ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्स बॅनरच्या पठाण (Pathaan) मध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे.
Pathaan OTT Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्स बॅनरच्या 'पठाण' मध्ये काही बदल करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रिप्शन जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सर्व बदल ओटीटी रिलीजबाबत सांगण्यात आले आहेत.
पुन्हा प्रमाणपत्र घ्यावे लागेल
दिल्ली उच्च न्यायालयाने ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी पठाणमध्ये काही बदल करण्याच्या सूचना देताना म्हटले आहे की, चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रिप्शन अॅड करावेत, जेणेकरून दृष्टिहीन लोकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा आनंद घेता येईल. बदल केल्यानंतर उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना सीबीएफसीककडून (CBFC) पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास सांगितले आहे.
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, न्यायालयाने निर्मात्यांना यासंदर्भातील अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सीबीएफसीला 10 मार्चपर्यंत निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, चित्रपटाची थिएटर रिलीज डेट जवळ आल्याने चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याबाबत न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट एप्रिलमध्ये ओटीटीवर येऊ शकतो. त्यामुळे ओटीटी आवृत्तीमध्ये सर्व बदल करणे आवश्यक आहे.
25 जानेवारीला चित्रपट होणार रिलीज
पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती
पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बेशरम रंग या गाण्यावरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pathaan Advance Collection: परदेशात 'पठाण' चा डंका; रिलीज होण्याआधीच केली बंपर कमाई