Salman Khan House Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी कितीची सुपारी वाजवली?
Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना सुपारी देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Salman Khan House Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आता हळूहळू माहिती समोर येऊ लागली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने झालेला गोळीबार हा सलमान खानला घाबरवण्यासाठीच करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांना सलमानला घाबरवण्यासाठी बिश्नोईकडून आरोपीना जबाबदारी देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सलमान खानच्या घरावर हल्लेखोरांनी 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या घटनेचा तपास सुरू केला. या घटनेला 72 तास पूर्ण होण्याआधीच गुजरातमधील भूज येथून आरोपींना जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले. आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपींना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. या हल्ल्यासाठी आरोपींना पैसेही देण्यात आली.
गोळीबारासाठी किती रुपयांची सुपारी?
दोन्ही आरोपींना सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी एक लाख रुपये आगाऊ मिळाले होते. काम फत्ते झाल्यावर आरोपींनानंतर आणखी 4 लाख मिळणार होते. अशी एकूण चार लाख रुपयांची सुपारी आरोपींना हल्ल्यासाठी मिळाली असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
आरोपींनी अॅडव्हान्स मिळालेल्या एक लाखाचे काय केले?
सुपारीसाठी आधी मिळालेल्या एक लाख रुपयांचे आरोपीनी काय काय केलं याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच यातील 50 हजार रुपये हे आरोपींना अनमोलकडून दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने ऑनलाईन पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींनी 24 हजार रुपयांमध्ये सेकंड हँड बाईक खरेदी केली. हीच बाईक हल्ल्यात वापरण्यात आली होती. त्याशिवाय, नवीन रूम भाड्याने घेण्यासाठी 10 हजार डिपॉझिट म्हणून जमा केले तर साडेतीन हजार रूम भाडे ठरवले. जवळपास 11 महिन्याचा घर भाडेकरार हा दोन्ही आरोपीकडून करण्यात आले होता.
सलमानच्या घरावर हल्ला करण्यासाठी आरोपींना पिस्तुल पुरवण्यात आले होते. आता हे पिस्तुल कोणी पुरवले याचा तपास सुरू झाला आहे.
अनमोल दोन्ही आरोपींच्या थेट संपर्कात
सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानंतर फेसबुकवर अनमोल बिश्नोईने जबाबदारी घेतली होती. हाच अनमोल दोन्ही आरोपींच्या थेट संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. आता पुढील तपासासाठी मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईची कोठडी घेण्याची शक्यता आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.