Saif Ali Khan Attack : नामांकित कंपनीत जॉब, 'एम्प्लॉई ऑफ द इयर'चा पुरस्कार; सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मदविषयी महत्त्वाची माहिती उघड
Saif Ali Khan Case Update : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे.
Saif Ali Khan Stabbed : अभिनेता सैफ अली खानच्या घरी घुसलेल्या अज्ञात हल्लेखोराला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी ठाण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला होता. नामांकित कंपनीच्या लेबर कॅम्पमध्ये हा नोकरीला होता. त्याआधी तो एका हॉटेलमध्ये कामाला होता, जिथे त्याला चांगलं काम करण्यासाठी पुरस्कारही देण्यात आला होता, अशीही माहिती समोर आली आहे.
आरोपीला आज न्यायालयात हजर करणार
आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असल्याची माहिती आहे. हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची पोलिसांची शक्यता आहे. आरोपीकडे भारतीय ओळखपत्रे नसल्याने तो भारतात अवैधरित्या वास्तव्यात होता असा पोलिसांना संशय आहे. या दृष्टीने पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाईल आणि पोलिस कस्टडीची मागणी केली जाईल.
नामांकित कंपनीत नोकरी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काम करत असलेला लेबर कँप आहे, तो परिसर जंगलासारखा खूप झाडी-झुडुपे असलेला आहे. या परिसरात जाऊन हा आरोपी झोपला होता. देहयष्टी मजबूत असल्याने चार ते पाच पोलिसांची ताकद त्याच्या मुसक्या आवळण्यास लागली. आरोपी नामांकित कंपनीत लेबर कॅम्पमध्ये नोकरीला होता. हा आरोपी लेबर कॅम्पमध्ये काम करण्याआधी वांद्रे परिसरात एक हॉटेलमध्ये कामाला होता.
'एम्पलॉई ऑफ द इयर'चा पुरस्कार
आरोपी आधी वांद्रेमध्ये एका हॉटेलमध्ये कामाला होता. तिथे त्याला 'एम्पलॉई ऑफ द इयर पुरस्कार' मिळाला होता. वांद्रे परिसरात उच्चभ्रू वस्ती आहे, त्यामुळे सैफच्या असे नाही पण या विभागात कोणत्याही उच्चभ्रू व्यक्तीच्या घरात चोरी केल्यास खूप पैसे मिळतील असे त्याला वाटले.
'या' कारणामुळे केली चोरी
आरोपीने प्राथमिक तपासात पोलिसांना सांगितलं की, पैशाची गरज असल्यानेच तो चोरी करायला तिथे गेला. परिमंडळ 6 आणि परिमंडळ 9 अशा दोन झोनच्या टीमने एकत्र येऊन हे सर्च ऑपरेशन केलं. यात सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करुन पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. या सर्व ऑपरेशनमध्ये उपायुक्त दर्जाचे अधिकारी ही सहभागी होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :