(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Riteish Deshmukh Genelia Deshmukh : 'तुझे मेरी कसम' ते 'वेड'; रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण
Mumbai Film Company : रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीला 10 वर्षे पूर्ण होत आहेत.
Riteish Deshmukh Genelia Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' (Ved) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दोघेही आज आघाडीचे कलाकार आहेत. दोघांनी 'तुझे मेरी कसम' (Tujhe Meri Kasam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. आज त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झाले आहेत.
रितेश-जिनिलियाने वीस वर्षांपूर्वी कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आज दिग्दर्शक, निर्माते अशा विविध भूमिका ते बजावत आहेत. एकीकडे रितेश-जिनिलियाच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला वीस वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे त्यांच्या मुंबई फिल्म कंपनीला उद्या (4 जानेवारी) 10 वर्ष पूर्ण होणार आहेत.
रितेशने 2003 साली 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने 'कूल है हम', 'ब्लफमास्टर', 'बे बेबी', 'धमाल', 'दे ताली', 'हाऊसफुल्ल', 'डबल धमाल', 'हाऊसफुल्ल 2', 'क्या सुपर कूल है हम', 'ग्रॅंड मस्ती' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत त्याने काम केलं आहे.
रितेशने 2013 साली 'बालक-पालक' या सिनेमाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 2014 साली 'लय भारी' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता म्हणून रितेशने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. अनेक लोकप्रिय सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणूनदेखील तो झळकला आहे.
जिनिलियाने मॉडेलिंगच्या माध्यमातून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 2003 साली तिने 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने 'चान्स पे डान्स', 'फोर्स', 'तेरे नाल लव हो गया', 'जय हो' अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत तिने काम केलं आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर जिनिलियाने आता 'वेड'च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. या सिनेमाची ती निर्मातीदेखील आहे.
रितेश-जिनिलियाची जोडी कशी जमली?
'तुझे मेरी कसम' या सिनेमात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास 10 वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर 2012 साली ते लग्नबंधनात अडकले. रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.
संबंधित बातम्या