एक्स्प्लोर
Advertisement
REVIEW : भारत - सलमान.. सलमान आणि फक्त सलमान!!
सिनेमाा 2010 मध्ये सुरु होतो. आज भारत आहे 70 वर्षाचा. तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. तो करता करता सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. भारत-पाकिस्तानच्या फाळणीभवती भारतची गोष्ट फिरते.
सिनेमातला नायक कमाल आहे.
तो काहीही करतो.
म्हणजे असं..
तो मर्चंट नेव्हीत असतो. काम करत असतो. एक दिवस त्या जहाजावर सागरी चाच्यांचं आक्रमण होतं. सशस्त्र चाच्यांशी तडजोड करण्यासाठी तो तिथे चर्चा करतो. विषय मायकल जॅक्सनवरुन थेट नेल्सन मंडेलांपर्यंत जातो. चाच्यांना नायकाचं अपार नॉलेज लक्षात येतं. ते गहिवरतात आणि त्यांच्या जहाजाला सोडून देतात.
..
नायक आता 70 वर्षाचा आहे. तो आपला इतिहास सांगतोय. तो सांगत असताना सिनेमा थेट चाळीसेक वर्षं मागे जातो. म्हणजे साल साधारण 60 चं दशक. त्यावेळी नायक सर्कशीत काम करत असतो. तिथे तो गाणं कोणतं म्हणतो? "डुब जाऊंगा मैं तेरे आँखो के ओशन में.. स्लो मोशन में.." तो ते अत्यंत कन्व्हिंगसिंगली म्हणतो आणि अंग झाकायला अत्यंत मोजके कपडे घातलेल्या नायिकेला ते पटतं.
..
हा नायक गोष्टीतला आहे सत्तर वर्षाचा. त्याला दाढी आलीय. केस पिकलेत. दाढीही पिकली आहेच. चेहरा पाहाल तर वाटतं हो रे.. नायक खरंच सत्तरीचा असू शकतो. पण त्याचा लॉंग शॉट आला की लक्षात येतं की अरेच्चा... खांद्याखाली हा नायक ऐन पस्तीशीतलाच पिळदार शरीरयष्टीचा आहे. त्याची चाल.. त्याचं पोश्चर अगदी सेम तरण्याबांड नायकाला लाजवेल असंच आहे. तरीही ते आपण खपवून घेतो.
...
असे अनेक किस्से. हे किस्से घडत असतात आणि आपण आपले डोळे सताड उघडे ठेवून ते पाहात असतो. कारण तो नायक कोणी साधासुधा नसतो. तर तो असतो साक्षात सलमान खान. जी गोष्ट दक्षिणेत रजनीकांत यांना लागू होते. तिच थोड्याफार फरकाने इकडे सलमानला लागू होते. म्हणजे असं की लोकांना सलमान हवा असतो. तो त्याची तब्येत. ती त्याने कशीही दाखवली तरी चालत असते. त्याचा डोळ्यातून झिरपणारा खट्याळ मस्तवालपणा लोकांना हवा असतो. सध्या रिलीज झालेला 'भारत' त्याला अपवाद नाही. अली अब्बास जफरने त्याचं दिसणं पुरेपूर कॅश केलं आहे. सिनेमा रिलीज होऊन दोन दिवस झाले आहेत. त्याला मिळालेलं ओपनिंग पाहता त्याच्या चाहत्यांना त्याने मेजवानी दिली आहे.
सलमानचे काही सिनेमे खरंच पूर्ण मसालेदार असूनही पुरेपूर रंजन करणारे होते. यात आवर्जुन उल्लेख करावा लागेल तो वॉण्टेड, दबंग, सुलतान, बजरंगी भाईजान आदी सिनेमांचा. कारण हे सिनेमे दे मार होतेच. पण त्यात त्याला एक गोष्ट होती. ती फार रंजक होती. अली अब्बास जफर हा काही पहिल्यांदा सलमानला दिग्दर्शित करतोय असं नाही. त्यामुळे अपेक्षा वाढतात. मघाशी सांगितल्याप्रमाणे सलमानचं दिसणं इथे दिग्दर्शकाने पुरेपूर कॅश केलं आहे. पण जेव्हा कथा आणि पटकथेचा भाग येतो त्यावेळी या सिनेमाची गोष्ट अगदीच पोकळ आहे. आणि ती जम्पिंग जॅकसारखी उड्या मारत पुढेपुढे जाते. कारण यातला स्पॅन खूप मोठा घेतला आहे.
सिनेमाा 2010 मध्ये सुरु होतो. आज भारत आहे 70 वर्षाचा. तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. तो करता करता सिनेमा फ्लॅशबॅकमध्ये जातो. भारत-पाकिस्तानच्या फाळणीभवती भारतची गोष्ट फिरते. फाळणीवेळी भारत आणि त्याचं कुटुंब भारतात वडिलांच्या बहिणीकडे येतं. त्या गर्दीत भारतची छोटी बहीण गुडिया प्लॅटफॉर्मवर राहते. तिला घ्यायला तिचे वडील उतरतात. तो दोघे पाकिस्तानात आणि भारत, त्याची आई आणि दोन भावंडं भारतात असा प्रकार होतो. घरची जबाबदारी भारतवर येते. डेअरिंगबाज भारत एकेक जॉब स्वीकारत पुढे जातो. मग त्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी माणसं भेटतात. मैत्रीणी भेटतात. त्यातून त्याला कुमुद मॅडम सर भेटते. मग गोष्ट पुढे जाऊन फ्लॅशबॅक पूर्ण होतो.
या सिनेमात अनेक इमोशनल प्रसंग घालण्यात आले आहेत. म्हणून सिनेमा होल्ड होतो. विशेष उल्लेख करायला हवा तो शेवटी येणाऱ्या फाळणीशी संबंधित टीव्हीशोचा. तो फक्कड जमला आहे. त्यावेळी मात्र डोळे पाणावतात. गाण्यांमध्ये 'स्लोमोशन में..', 'चाशनी..' ही गाणी चांगली जमली आहेत. त्यात सलमानने धमाकाही खूप केला आहे. अर्थात पैसा वसूल असलेला त्याचा वावर कमाल आहे.
सलमानसोबत सिनेमा तबू, कतरिना कैफ, सोनाली कुलकर्णी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आदी मंडळी आहेत. त्यांनीही मजा आणली आहे. मुद्दा असा की यात सबकुछ सलमान आहे. पण यातली गोष्ट अगदी अर्ध्या स्टारची आहे. ती जरा चांगली बांधली असती तर आणखी मजा आली असती. एक नक्की जो प्रयोग सलमानने ट्युबलााईट सिनेमात करण्याचा प्रयत्न केला होता. तो इथे केलेला नाही. कारण लोकांनी तो प्रयोग नाकारला. त्यांना फक्त सलमान पाहायचा होता. इथे त्याने दाढी-मिशा लावल्या खऱ्या. पण त्याचा त्याने फार लोड घेतलेला नाही. तो सलमानच आहे.
तर असा हा भारत. सलमान.. त्याच्या जोडीला दिशा पटनी, कतरिना कैफ आहेत. सलमान आवडत असेल जीवापाड.. तर पाहा सिनेमा. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला अडीच स्टार्स. सिनेमाच्या गोष्टीला आणि त्याच्या स्क्रीन प्लेला अर्धा स्टार. आणि सलमानसाठी दोन असे एकूणात अडीच स्टार्स.
थिएटरमधून बाहेर पडताना मार्त असं वाटून जातं.. की इतका देखणा.. तब्येतबाज नायक आपल्याकडे आहे, तर त्याचा वापर चांगली गोष्ट तयार करुन व्हायला हवा. असो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement