Deepti Naval : अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या ‘अ कंट्री कॉल्ड चाइल्डहुड’ पुस्तकाचे प्रकाशन, शबाना आझमी आणि मकरंद देशपांडेंची खास उपस्थिती!
Deepti Naval : सुप्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या जीवनावर आधारित 'अ कंट्री कॉल्ड चाइल्डहूड' (A Country Called Childhood) या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
Deepti Naval Biography : सुप्रसिद्ध अभिनेत्री, चित्रकार आणि कवयित्री दीप्ती नवल (Deepti Naval) यांच्या जीवनावर आधारित 'अ कंट्री कॉल्ड चाइल्डहूड' (A Country Called Childhood) या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अभिनेत्री दीप्ती नवल यांच्यासह अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azami) आणि अभिनेता मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेते मकरंद देशपांडे यांनी सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना मकरंद देशपांडे यांनी दीप्ती नवल यांच्या पुस्तकातील वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधले. तर, दीप्ती नवल यांच्या जवळच्या मैत्रिणी असणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमी यांनी पुस्तकातील काही विशेष भागांचे वाचन देखील केले. स्वतः दीप्ती यांनीही यावेळी त्यांच्या पुस्तकातील काही उतारे वाचले. या खास प्रसंगी दीप्ती यांनी त्यांच्या बालपणीच्या अनेक सोनेरी आठवणींना उजाळा दिला.
कलाकारांची विशेष उपस्थिती
दीप्ती नवल यांचे पूर्वाश्रमीचे पती आणि चित्रपट निर्माते प्रकाश झा देखील या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यांच्यासोबतच अभिनेता कंवलजीत सिंह, अनूप सोनी, अभिनेत्री दिव्या दत्ता, कृती कुल्हारी, जुही बब्बर, सोनाली कुलकर्णी, वर्षा उसगावकर, इंदिरा तिवारी, डॉली ठाकूर या कलाकारांनीही पुस्तक प्रकाशनाच्या वेळी विशेष उपस्थिती दर्शवली. यापैकी काही लोकांनी एबीपीशी संवाद साधला. त्यांनी दीप्ती नवल यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे काही पैलू उलगडले. तसेच, त्याच्या या पुस्तकातील सर्व आठवणी वाचण्याची उत्सुकता व्यक्त केली.
आत्मचरित्र नव्हे आठवणींचा ठेवा!
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर दीप्ती नवल यांनी एबीपीशी केलेल्या खास संवादात म्हटले की, त्यांच्या या पुस्तकाला आत्मचरित्र न म्हणता आठवणींचा ठेवा म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण, त्यांनी आपल्या बालपणापासून ते वयाच्या 19व्या वर्षापर्यंतच्या आठवणींचा यात समावेश केला आहे.
वयाच्या 13व्या वर्षी घरातून पळाल्या!
यावेळी दीप्ती नवल म्हणाल्या की, 'काश्मीर की कली' आणि 'जब जब फूल खिले' सारख्या चित्रपटांमध्ये काश्मीरचे सौंदर्य पाहिल्यानंतर, वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्या काश्मीरमध्ये जाण्यासाठी आपल्या अमृतसरमधील घरातून पळून गेल्या होत्या. पण, त्या पठाणकोटच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत आणि स्टेशनवर पकडले गेल्यानंतर त्यांना घरी परतावे लागले होते.
अभिनयासोबतच 70 वर्षीय अभिनेत्री दीप्ती नवल यांनी त्यांच्या चित्रकला, कविता, लेखन या छंदाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, 19 वर्षांपुढील आठवणी पुढील पुस्तकात मांडण्याचा विचार सध्या तरी त्यांच्या मनात नाही. तर, हे एकच पुस्तक नाही, सध्या वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्यासाठी चार पुस्तकांच्या कल्पना त्यांच्याकडे आहेत, ज्यावर काम करून त्या लवकरच पुस्तक प्रकाशन करतील.
हेही वाचा :
Entertainment News Live Updates 26 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Sonu Sood : कोरोनाकाळात केलेल्या विशेष कार्याबद्दल सोनू सूदचा 'आयएए विशेष पुरस्कारा'ने सन्मान