Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंहची पोलिसात धाव, 'त्या' व्हिडीओविरोधात एफआयआर दाखल
Ranveer Singh : अभिनेता आमिर खान पाठोपाठ आता रणवीर सिंहने पोलिसांमध्ये धाव घेत एफआयआर दाखल केला आहे.
Ranveer Singh : अभिनेता आमिर खान पाठोपाठ आता रणवीर सिंहने (Ranveer Singh) देखील पोलिसांत धाव घेतली आहे. रणवीर सिंहचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्याने कायदेशीर पावले उचलत सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत एफआयआर नोंदवला आहे.
आतापर्यंत अनेक फिल्म स्टार डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अभिनेता आमिर खाननंतर आता रणवीर सिंगचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना रणवीर सिंहचा राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रणवीर एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत असल्याचे दिसून आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यामूत तयार करण्यात आलेल्या या डीपफेक व्हिडीओविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
रणवीर सिंहच्या प्रवक्त्याकडून याबाबत एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. या निवेदनानुसार, अभिनेता रणवीर सिंहने डीपफेक व्हिडीओ प्रमोट करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
View this post on Instagram
रणवीरने चाहत्यांना केले आवाहन
अभिनेता रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. डीपफेकपासून वाचा मित्रांनो, असे त्याने लिहिले.
प्रकरण काय?
अभिनेता रणवीर सिंह हा नुकताच क्रिती सेनन आणि मनीष मल्होत्रासोबत एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वाराणसीला पोहोचला होता. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडीओत रणवीर एका राजकीय पक्षाच्या बाजूने बोलताना दिसत आहे. मात्र, या व्हिडीओच्या आवाजात छेडछाड केले असल्याचे दिसून येते. या व्हिडिओमध्ये AI च्या माध्यमातून व्हॉईस क्लोनच्या मदतीने त्याचे शब्द बदलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
आमिर खानचीही पोलिसांत तक्रार...
बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) देखील पोलिसात तक्रार केली आहे. सोशल मीडियावर आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओत आमिर खान एका विशष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आमिर खान करत असल्याचे दिसत आहे. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नसल्याचे आमिर खानने सांगितले.