Ameesha Patel: रांची कोर्टाने अमिषा पटेलला 500 रुपयांचा दंड ठोठावला; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
रांचीच्या दिवाणी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलला (Ameesha Patel) 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Ameesha Patel: अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. पण सध्या अमिषा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. रांचीच्या दिवाणी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अमिषावर चेक बाऊन्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. खटला दाखल करणार्या अजय सिंह यांच्यावतीने एका साक्षीदाराला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अमिषा पटेलच्या वकिलाला साक्षीदाराची उलटतपासणी करण्यास सांगितले, परंतु त्यासाठी वेळ मागितला गेला. यानंतर न्यायालयाने अमिषाला दंड ठोठावून या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख 7 ऑगस्ट निश्चित केली.
नेमकं प्रकरण काय?
2018 मध्ये अमिषाविरुद्ध चेक बाऊन्स प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चित्रपट निर्माता अजय कुमार सिंह यांनी अमिषाचा चेक बाऊन्स झाल्यानंतर तिच्या विरोधात केस दाखल केली होती. अरगोरा येथील रहिवासी अजय कुमार सिंह यांनी 2018 मध्ये कोर्टात अमिषाच्या विरोधात केस दाखल केली होती. न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात अमिषा पटेल हिने 17 जून रोजी रांची दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश डीएन शुक्ला यांच्या न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने तिला प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
अजय कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, अमिषा पटेलने म्युझिक मेकिंगच्या नावाखाली त्यांच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले, परंतु तिने या दिशेने कोणतेही पाऊल उचलले नाही. नंतर अमिषाने चित्रपट निर्मितीसाठी 2.5 कोटी घेतले. 2018 मध्ये जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, तेव्हा अजय सिंहने पैसे मागितले. नंतर अमिषाने 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले, जे बाऊन्स झाले. त्यानंतर अजय सिंह यांनी अमिषा पटेलवर खटला दाखल केला.
अमिषाचे आगामी चित्रपट
अमिषा ही गदर-2 या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गदर-2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 'गदर 2' हा चित्रपट 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'गदर 2' या चित्रपटामध्ये अमिषा 'सकीना' ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
