(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुस्साट! दमदार कलेक्शनमुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर्समध्ये वाढ!
ब्रह्मास्त्रनं 100 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केल्यानं आयनॉक्स आणि पीव्हीआरच्या (PVR) शेअरमध्ये वाढ झालीये.
PVR Share Price : बॉक्स ऑफिसवर सध्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं तीन दिवसांमध्ये 125 कोटींची कमाई केली. ब्रह्मास्त्रनं 100 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय केल्यानं आयनॉक्स आणि पीव्हीआरच्या (PVR) शेअरमध्ये वाढ झालीये.
पीव्हीआर आणि आयनॉक्स यांच्या शेअर्समध्ये वाढ
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटानं ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 211 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सोमवारी (12 सप्टेंबर) सकाळी जेव्हा शेअर बाजाराच्या व्यवहाराची सुरुवात झाली तेव्हा पीव्हीआरच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली. पीव्हीआरचे शेअर्स 5.10 टक्के वाढून 1928 रुपये पर्यंत पोहोचला.तर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये देखील वाढ झाली आहे. आयनोक्सच्या शेअर्समध्ये 5.40 टक्के वाढ नोंदवण्यात आली. आयनॉक्सचा शेअर 4.30 टक्यांनी वधारत 515 रुपयांवर व्यवहार करत होता. तर पीव्हीआरचा शेअर 3.62 टक्क्यांनी वधारत 1900 रुपयांवर व्यवहार करत होता.
पीव्हीआर आणि आयनॉक्सचे होणार विलीनीकरण
पीव्हीआर आणि आयनॉक्स यांचे विलीनीकरण होणार आहे, असं म्हणलं जात आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी शेअरधारकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या वर्षी मार्चमध्ये दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. विलीनीकरण झाल्यानंतर ही देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स कंपनी होईल.
400 कोटींचं बजेट
ब्रह्मास्त्र हा 410 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटानं पहिल्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. यामध्ये 37 कोटी हिंदी भाषेतील आणि 5 कोटी इतर भाषांतील कलेक्शन आहे. तिसऱ्या दिवशी 46 कोटींचे कलेक्शन या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केलं. तीन दिवसांमध्ये या चित्रपटानं 125 कोटींची कमाई केली. जगभरात या सिनेमाने 225 कोटींची कमाई केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :