Prashant Damle : प्रशांत दामले ठरले विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराचे यंदाचे मानकरी!
Vishnudas Bhave Gaurav Padak Award : अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर झाला आहे.
Prashant Damle on Vishnudas Bhave Gaurav Padak Award : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार (Vishnudas Bhave Gaurav Padak Award) जाहीर झाला आहे. अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा दिले जाणारे हे 56 वे गौरव पदक आहे.
5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार दिला जाणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25,000 हजार स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे.
विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. आतापर्यंत 54 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरित केला जात आहे.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 80 वर्ष नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते.
प्रशांत दामले यांच्याबद्दल जाणून घ्या...
प्रशाांत दामले हे अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष असण्यासोबत लोकप्रिय अभिनेते आहेत. गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. अभिनेते असण्यासोबत ते गायक, पार्श्वगायक आणि नाट्यनिर्मातेही आहेत.
विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत.
कलेच्या प्रवासात प्रशांत दामले यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी नाटकाशिवाय 37 मराठी चित्रपट आणि 24 दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'आम्ही सारे खवय्ये' या लोकप्रिय मालिकेचाही समावेश आहे. दामले यांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.
मराठी रंगभूमीला मिळालेला चतुरस्त्र अभिनेता प्रशांत दामले!
प्रशांत दामले यांनी फेब्रुवारी 1983 पासून आजपर्यंत 12500 पेक्षा अधिक नाटकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत. टूर टूर, पाहुणा, चाल काहीतरीच काय, गेला माधव कुणीकडे, बे दुणे चार, शूः कुठे बोलायचे नाही, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, जादू तेरी नजर, कार्टी काळजात घुसली, साखर खाल्लेला माणूस, सारख काहीतरी होतय, लेकुरे उदंड झाली ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. एकंदरीतच प्रशांत दामले मराठी रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते आहेत.
संबंधित बातम्या