(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Lynching | पालघर साधू हत्याकांडावर आधारित शॉर्ट फिल्म उद्या यूट्युबर होणार रिलीज
पालघरमध्ये 70 आणि 35 वर्षांच्या साधूंची हत्या गावकर्यांमध्ये पसरलेल्या अफवामुळे झाली असं मला वाटत नाही असं, पुनीत इस्सरने म्हटलं.
मुंबई : गेल्यावर्षी लॉकडाऊनदरम्यान पालघर येथे झालेल्या साधू हत्याकांडाचे पडसाद अवघ्या देशभरात उमटले होते. 16 एप्रिल 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधूंची बेदम मारहाण करुन त्यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. याच घटनेवर आधारित एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. ज्यात पुनीत इस्सर मुख्य भूमिकेत साधूच्या रूपात दिसणार आहे.
पुनीत इस्सरचा मुलगा सिद्धांत इस्सर ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित करत आहे संहार : द मसॅकर' असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे. या घटनेला 16 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या वर्ष पूर्ण होत आहे. त्याच दिवशी ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर रिलीज केली जाणार आहे. या फिल्मविषयी एबीपी न्यूजशी बोलताना अभिनेता पुनीत इस्सर म्हणाले की, त्या दोन साधूंचा दोष काय होता? अशा प्रकारे पोलिसांच्या उपस्थितीत त्यांना मारहाण करुन त्यांची हत्या का केली गेली?"
पालघरमध्ये 70 आणि 35 वर्षांच्या साधूंची हत्या गावकर्यांमध्ये पसरलेल्या अफवेमुळे झाली असं मला वाटत नाही असं, पुनीत इस्सर यांनी म्हटलं. एका कटानुसार या दोन्ही साधूंची हत्या करणण्यात आली आहे. साधूंच्या या हत्येमागील षडयंत्र काय होते? या हत्याकांडाचं सत्य जगासमोर यावं, हेच दाखवण्यासाठी ही शॉर्ट फिल्म बनवल्याचं पुनीतने सांगितलं.
पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे गुजरातकडे चालले होते. पण, गुजरातची सीमा बंद असल्यामुळे त्यांना पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे ही गाडी 15 मिनिटाने मागे आली. गाडी जशी मागे आली तेव्हा तिथे अचानक लोकं जमा झाले. जवळपास हजार लोकं होती. त्यांच्या हातात लाठ्या काठ्या, कोयते आणि कुऱ्हाडी होत्या. काही कळायच्या आत लोकांनी या तिघांना मारहाण सुरू केली.
दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गडचिंचले येथे तिघांची हत्या केली. या प्रकरणात जवळपास 500 च्या वर संशयिताना सीआईडी ने ताब्यात घेतले होते पैकी 13 अल्पवयीन सह 251 आरोपींना अटक केली होती. सध्या यापैकी काहींना जामीन मंजूर झाला असून 70 पेक्षा जास्त अजूनही अटक आहेत.
साधूंची हत्या कुठल्याही कटाचा भाग नाही
पालघर जिल्ह्यतील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेनं 12 हजार पानांची दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात 250 हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. 'लोक अफवेला बळी पडल्यामुळं हा प्रकार घडला होता. साधूंची हत्या हा कुठल्याही कटाचा भाग नसून या घटनेचा कुठल्याही धर्माशी संबंध नाही, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.