Narcotics Control Bureau: आर्यन खान प्रकरणाचा तपास अधिकारी सेवेतून बडतर्फ; वर्षभराच्या निलंबनानंतर करण्यात आली कारवाई
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने विश्व विजय सिंह (Vishwa Vijay Singh) यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
Narcotics Control Bureau: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पोलीस अधीक्षक (SP) विश्व विजय सिंह (Vishwa Vijay Singh) यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. विश्व विजय सिंह हे ऑक्टोबर 2021 मध्ये सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक करणाऱ्या आणि कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकणाऱ्या टीमचा भाग होते. पण ज्या प्रकरणामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ आले आहे, त्या प्रकरणाचा आर्यन खानच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.
विश्व विजय सिंह यांना गेल्या वर्षी एप्रिलपासून निलंबित करण्यात आले होते आणि त्यांची एनसीबीकडून चौकशी सुरू होती. एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, एका वेगळ्या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्यानंतर विश्व विजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एनसीबीचे महासंचालक सत्य नारायण प्रधान यांनी विश्व विजय सिंह यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विश्व विजय सिंह यांनी प्रकरणाबाबत सांगितलं की, ते या प्रकरणावर भाष्य करू इच्छित नाहीत. हे प्रकरण गृह मंत्रालयाकडे (MHA) प्रलंबित आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय विश्वनाथ तिवारी नावाच्या अधिकाऱ्यालाही बडतर्फ करण्यात आलं आहे, असंही म्हटलं जात आहे.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या छापेमारीमध्ये एनसीबीने ड्रग्ज आणि 1.33 लाख रुपये रोख जप्त केल्याचा दावा केला. या प्रकरणी आर्यन खान , अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा यांना काही तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली.
आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली.
आर्यन खानच्या या प्रकरणावर गौरी खाननं कॉफी विथ करण या शोमध्ये प्रतिक्रिया दिली होती. 'कठीण काळात आमचे मित्र आणि अनेक लोक एकत्र उभे राहिले ज्यांना आम्ही ओळखत नाही ते लोक देखील आमच्यासोबत होते. आम्हाला यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांचे मी आभार मानते.' असं गौरीनं या कार्यक्रमामध्ये सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aaryan Khan: आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'पोलिसांनी एवढं धुतलं की...'