एक्स्प्लोर
एकजुटीने पेटलं रान.. वॉटरकपच्या नव्या पर्वाचा म्युझिक व्हिडिओ
![एकजुटीने पेटलं रान.. वॉटरकपच्या नव्या पर्वाचा म्युझिक व्हिडिओ Music Video Of Satyamev Jayate Pani Foundation Water Cup Competition एकजुटीने पेटलं रान.. वॉटरकपच्या नव्या पर्वाचा म्युझिक व्हिडिओ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/03184810/Paani-Foundation.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पानी फाऊण्डेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमीर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती लावली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या ध्यासाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 13 जिल्ह्यातील 30 तालुक्यांचा समावेश होणार आहे. विशेष म्हणजे आमीर खानने याबाबत जनजागृतीसाठी एक म्युझिक व्हिडिओही तयार केला आहे.
असे मुख्यमंत्री लाभणं भाग्याचं : आमीर
फडणवीसांच्या मनात जी पॅशन आहे, ती माझ्यात आणि सत्यजीत भटकळमध्ये ट्रान्सफॉर्म झाली आहे. या स्पर्धेला लोकचळवळीचं स्वरुप दिलं तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य माझ्या मनात पक्कं बसलं आहे, असं मनोगत आमीर खानने व्यक्त केलं. असे मुख्यमंत्री लाभणं आपलं भाग्य असल्याचंही आमीर म्हणाला.
तीन तालुक्यांपासून सुरु केलेला प्रवास 30 वर पोहचला आहे, तो दुप्पट करण्याचा निर्धारही आमीरने व्यक्त केला. दंगल चित्रपटाच्या यशाचं सोडा, दुसऱ्या पर्वात आम्ही यशस्वी झालो, तर खरा आनंद आहे, असंही आमीर म्हणाला.
आमीर म्हणजे रामायणातला हनुमान : मुख्यमंत्री
वॉटर कपचं दुसरं पर्व सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनेता आमीर खानचं अभिनंदन केलं. आमीरची भूमिका रामायणातल्या हनुमानासारखी आहे, त्याला त्याच्या शक्तीची जाण करून द्यावी लागते. आमीर म्हणत होता 'ये सब कैसे होगा, हमे और परफेक्ट होना होगा, मी म्हटलं आप हात में लोगे तो परफेक्ट ही होगा' अशा शब्दात फडणवीसांनी आमीरचं कौतुक केलं.
'पाणी आडवा, पाणी जिरवा' हे गेली 40 वर्ष ऐकत आहोत, पण लोकचळवळ झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं. आतापर्यंत लोकं आडवा आणि त्यांची जिरवा असंच सुरु राहिल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
प्रशिक्षांची इतकी मोठी फळी तयार झाली आहे की पुढच्या वेळी 30 ऐवजी 300 तालुके घेऊ शकतो. ही जलसेना तयार झाल्यामुळे हे सगळं शक्य झालं. पानी फाऊण्डेशनचा सहभाग महाराष्ट्राच्या जल संधारणाच्या कामाच्या इतिहासात लिहिला जाईल, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
पानी फाऊण्डेशनचा खास म्युझिक व्हिडिओ
आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी स्पर्धेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी एक म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. किरण या व्हिडिओतून पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे किरण रावने मराठी भाषेत गाणं गायलं आहे. गुरु ठाकूरने हे गाणं लिहिलं असून अजय-अतुलने संगीतबद्ध केलं आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन केलं आहे. ‘सैराट’ फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, अभिनेता जितेंद्र जोशी, सुनील बर्वे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल यासारखे काही कलाकार व्हिडिओत झळकले आहेत. यासोबत खुद्द आमीर खानही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्या पर्वात साताऱ्यातील वेळू हे गाव अव्वल आलं होतं. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा कालावधी 8 एप्रिल 2017 ते 22 मे 2017 हा असेल. स्पर्धेच्या अखेरीस तीन विजेत्या गावांची निवड केली जाणार आहे. प्रथम क्रमांकाच्या गावाला 50 लाख, द्वितीय क्रमांकाच्या गावाला 30 लाख, तर तृतीय क्रमांकाच्या गावाला 20 लाखांचं रोख पारितोषिक मिळेल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एका गावाला 10 लाखांचं बक्षीस देण्यात येईल.
वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात सहभागी 30 तालुके
पुणे - पुरंदर, इंदापूर
वाशिम - कारंजा
सातारा - कोरेगाव, माण, खटाव
औरंगाबाद - फुलंब्री, खुलताबाद
उस्मानाबाद - भूम, परंडा, कळंब
लातूर - औसा, निलंगा
वर्धा - आर्वी
यवतमाळ - राळेगाव, कळंब, उमरखेड
अकोला - अकोट, पातुर, बार्शी-टाकळी
सांगली - खानापूर, आटपाडी, जत
सोलापूर - सांगोला, उत्तर सोलापूर
बीड - अंबेजोगाई, केज, धारुर
अमरावती - वरुड, धारणी
पाहा म्युझिक व्हिडिओ :
संबंधित बातम्या :
वॉटर कपचा व्हिडिओ, किरण रावचा आवाज, रिंकू-आकाश झळकणार
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत साताऱ्यातील वेळू अव्वल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)