Shaktimaan Movie : 'शक्तिमान' चे 300 कोटींचे बजेट; मुकेश खन्ना म्हणाले, 'माझ्याशिवाय हा चित्रपट होऊच शकत नाही'
अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी शक्तिमान या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
Shaktimaan Movie : छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमानला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक कॅरेक्टर आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनी पिचर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून 'शक्तिमान' (Shaktimaan) मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता 17 वर्षांनंतर हा शक्तिमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण मालिकेमधून नाही तर चित्रपटामधून हा 'शक्तिमान' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका मुलाखतीमध्ये मालिकेत शक्तिमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
300 कोटींचे बजेट
मुकेश खन्ना यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं, 'अनेक वर्षांनी हा प्रकल्प माझ्याकडे आला आहे. लोक मला शक्तीमान 2 बनवायला सांगायचे. मला शक्तीमानला पुन्हा टीव्हीवर आणायचे नव्हते. मी सोनीच्या टीमसोबत हात मिळवला. हा किमान 300 कोटींचे बजेट असणारा मोठा चित्रपट आहे.'
कोण साकारणार शक्तिमानची भूमिका?
मुकेश खन्ना यांनी पुढे सांगितले,' 300 कोटी रुपयांचे बिग बजेट असलेला हा चित्रपट बनायला वेळ लागेल, पण हा चित्रपट देसी संकल्पनेवर आधारित असेल. हा चित्रपट स्पायडर मॅनचे निर्माते बनवत असले तरी शक्तीमान देसी असणार आहे. चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे. माझी एक अट होती की, चित्रपटाची कथा बदलणार नाही. लोक विचारत आहेत, कोण होणार शक्तीमान? हा देखील एक खूप मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर मी देणार नाही, परंतु मुकेश खन्नाशिवाय शक्तिमान होणार नाही हे देखील निश्चित आहे. '
शक्तिमान ही मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाली. 2005 पर्यंत शक्तिमान ही मालिका प्रसारित होत होती. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तिमान या दोन भूमिका साकरल्या.आता शक्तिमान या चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहेत. अजून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
हेही वाचा :