Arjun Kapoor : ‘लोकांना धमकावण्यापेक्षा अभिनयावर लक्ष दे’, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचा अर्जुन कपूरला सल्ला!
Arjun Kapoor : अर्जुन कपूरचे वक्तव्य समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही अर्जुन कपूरवर निशाणा साधला.
Arjun Kapoor : सोशल मीडियावर बराच काळ ‘बॉयकॉट बॉलिवूड’चा बोलबाला सुरु आहे. बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडिया यूजर्सकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, आतापर्यंत अनेक स्टार्सनी या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) देखील या ट्रेंडवर व्यक्त झाला होता. त्याने यावर आपला संताप व्यक्त केला होता. मात्र, अर्जुनचे वक्तव्य आता त्यालाच भारी पडत आहे. या वक्तव्यामुळे अभिनेता आता ट्रोल होऊ लागला आहे. यातच आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी देखील अर्जुन कपूरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हटले की, अर्जुन कपूरने जनतेला धमकावण्याऐवजी आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हिंमत असेल तर इतर धर्माच्या लोकांवरही चित्रपट बनवा. या वक्तव्यावरून त्यांनी अर्जुन कपूरला फ्लॉप अभिनेताही म्हटले असून, गुंडगिरीने काहीही होणार नाही, आता जनता जागरूक झाली आहे, तेव्हा अभिनयावर लक्ष द्या, असा सल्ला दिला आहे.
काय म्हणालेला अर्जुन कपूर?
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ‘बॉयकॉट’चा ट्रेंड सुरु आहे. मोठ्या प्रमाणात बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट केले जात आहे. याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर देखील होताना दिसत आहे. यावर बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, 'आपण सर्वांनी याबाबत शांत राहून चूक केली आहे. यावर शांत राहून प्रत्येकजण स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावत काम करत होता, त्याचाच गैरफायदा घेऊ लागले आहेत. इंडस्ट्रीतील लोकांना वाटते की, त्यांचे काम त्यांच्यासाठी बोलेल. मात्र, आता ट्रोल करणाऱ्यांना याची सवय लागली आहे.’
आडनावांमुळे चित्रपटांवर बहिष्कार टाकणे चुकीचे : अर्जुन कपूर
तो म्हणाला की, ‘इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे. कारण लोक त्यांच्याबद्दल काय लिहितात किंवा ते ज्या हॅशटॅगचा ट्रेंड करतात ते वास्तवापासून वेगळे असतात. जेव्हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात, तेव्हा त्यांना ते आवडत नाही. अभिनेत्यांच्या आडनावांमुळे चित्रपटांवर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. लोक सतत चिखल फेक करत राहिले, तर नवीन गाडीचीही चमक थोडी कमी होईल, नाही का? आम्ही तर खूप चिखलाचा सामना केला आहे. पण, तरीही आम्ही त्याकडे डोळेझाक केली आहे.’
अर्जुन कपूरचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही अर्जुन कपूरवर निशाणा साधला.
हेही वाचा :
Ranveer Singh Bold Photos : विनाकारण ट्रोल करू नका; रणवीर भावाला 'व्हिलन'चा सपोर्ट
Arjun Kapoor : अर्जुननं वांद्रे येथील फ्लॅट विकला; इतक्या कोटींमध्ये झाली डील