एक्स्प्लोर
रिव्ह्यू : काला
'काला'चा रंजक रजनी अवतार!
'काला'चा रंजक रजनी अवतार!
रजनीकांतचा सिनेमा येणार असला की लोकांना विशेषत: त्याच्या फॅन्सना कोण आनंद होतो. गुरूवारी पहाटेपासूनच त्याच्या चाहत्यांनी जो काही हा सिनेमा साजरा केला ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. कारण त्यांचा आपला थलैवा थिएटरवर लागणार होता. रजनीकांतने या सिनेमात नेमकी काय भूमिका केली आहे, त्या सिनेमाचा विषय काय आहे, कलाकार म्हणून यात त्याने काय वेगळा प्रयोग केला आहे का.. असं काहीही पाहण्यात या चाहत्यांना रस नसतो. त्यांना फक्त त्या मोठ्या पडद्यावर रजनीकांत पाहायचा असतो. काला हा चित्रपट रसिकांची ही तहान शमवतो. या सिनेमात रजनी स्टाईल दिसते. यात रजनीकांत नाचतो, रडतो, गातो, ठोकतो, पाडतो, पडतो, उठतो, उठवतो आणि जिंकतो.
प्रेक्षकांनाही हेच हवं असतं. म्हणून रजनीकांत आला रे.. यातलं आला रे म्हणेपर्यंत त्याच्या सिनेमाने बाॅक्स आॅफिसवर उच्चांकी मजल मारलेली असते.
काला हा धारावीचा लोकनेता आहे. म्हणजे, सरकार सिनेमातले नागरे कसे असतात, तसे धारावीपुरता हा काला असतो. तो म्हणेल तो कायदा. धारावीतल्या लोकांवर प्रेम करणारा, विवेकी, इथल्या भूमिपुत्रांसाठी लढणारा असा काला. तर या धारावीवर राजकीय नेता असलेल्या हरि अभ्यंकरचा डोळा असतो. या धारावीतल्या झोपडपट्ट्या हटवून तिथे अलिशान सिटी उभारण्याचा त्याचा मनसुबा असतो. पण त्याच्या या इच्छेमध्ये असतो, तो काला. मग या काला विरूद्ध हरी असं युद्ध होतं. त्या युद्धाची ही कहाणी. आता कहाणी वाचल्यावर यात विजय कालाचा होणार हे उघड आहे. पण मग तो काला कसा रजनीकांतचा अवतार घेऊन ही कामगिरी पार पाडतो ते पाहाणं गमतीदार आहे.
सिनेमा म्हणून पाहायला गेलं तर या कथेत फार दम नाही. किंवा काही उत्कंठावर्धक प्रसंगही नाहीत. सरळसोट घडत जाणारी गोष्ट आहे. टिपिकल डायलाॅगबाजी आहे. दक्षिणस्टाईल सिनेमात असते तशी वायपळ बडबडबाजी आहे. इथेही हिरो काहीही करू शकतो. तरीही आपण हा सिनेमा बघतो कारण यात हिरो असतो रजनीकांत. त्याची स्टाईल, काळे कपडे. लुंगी आणि गाॅगलवाल्या स्टाईलवर आपण फिदा होतो. काळा कभिन्न.. टक्कल पडलेला, पांढऱ्या दाढीस वावरणारा सामान्य अंगचणीचा रजनीकांत नामक नट विग चढवून पडद्यावर अवतरतो तेव्हा, त्याच्यातलं होणारं ट्रान्सफाॅर्मेशन पाहणं कमालीचं कुतूहलाचं वाटतं. तो आजही त्याच ऊर्जेनं नाचतो, गातो, स्टंट करतो. त्याच्या या ऊर्जेवर आपण फिदा होतो.
एक नक्की हा सिनेमा रजनीकांतचा आहे. या सिनेमाला कथा, पटकथा, संकलन, छायांकन, पार्श्वसंगीत या बाबी आहेत. पण त्याचं फार काम नाही. पडद्यावर रजनीने काहीही केलं तरी ते आपल्याला पटतं, इतक्या सराईतपणे तो ते करतो. या सिनेमात त्याच्याशिवाय नाना पाटेकर आहेत. हरी अभ्यंकरची खलनायकी भूमिका त्यांनी साकारली आहे. त्यांची एंट्री, जरब या सिनेमात मस्त दिसते. व्यक्तिरेखा त्यांनी चपखल साकारली असली, तरी यातली संवादफेक पाहताना यापूर्वी त्यांनी केलेले इतर अनेक सिनेमे आपल्याला आठवत राहतात. सयाजी शिंदे यांच्यासारखा उत्तम नट यात आहे. पण त्यांना यात केवळ चवीपुरतं वापरलं आहे. त्यांना आणखी मोठी भूमिका द्यायला हवी होती असं वाटत राहतं. अंजली पाटील हा एक मराठी चेहरा यात आहे. त्यात तिच्या भूमिकेला खोली नाहीय. पण, सिनेमाभर ती कालासोबत वावरली आहे.
तर असा हा सिनेमा आहे. एकूणात खरंतर हा रिव्ह्यू सिनेमाचा नसून एकट्या रजनीचा आहे. कारण लोक सिनेमा पाहायला जात नाहीत. त्यांना केवळ रजनीकांत पाहायचा असतो. म्हणून या रजनीकांतला पिक्चरबिक्चरमध्ये मिळतोय लाईक.
का पहाल सिनेमा ३ कारणे
१ गोष्ट फार बरी नसूनही रजनीमुळे प्रेक्षक सिनेमाशी कसे खिळून राहतात ते पाहण्यासाठी
२ हरी अभ्यंकरला नेस्तनाबूत करण्यासाठी कालाने रजनीचा अवतार कसा घेतला ते पाहण्यासाठी
३ रजनीकांतचे स्टंट, गाणं, नाच पाहण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement