Mohandas Sukhtankar : मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मोहनदास सुखटणकरांना पहिलं नाटक कसं मिळालं? जाणून घ्या कारकीर्द
Mohandas Sukhtankar : मोहनदास सुखटणकर हे मराठी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते होते. त्यांनी मराठी रंगभूमी चांगलीच गाजवली आहे.
Mohandas Sukhtankar : ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर (Mohandas Sukhtankar) यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी पाच दशकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी गाजवली आहे. नाटकांप्रेमाणे त्यांनी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
मोहनदास सुखटणकरांना पहिल्यांदा रंग कसा लागला?
सुखटणकरांचं बालपण गोव्यात गेलं. शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. आंतरशालेय नाटुकल्या स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले होते. दुसरीत असताना त्यांनी 'खोडकर बंडू' या नाटुकलीत काम केलं. त्यावेळी त्यांना अभिनय येतो म्हणून नव्हे तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून शाळेतील शिक्षकांनी नाटुकलीत घेतलं होतं. या नाटुकलीच्या निमित्ताने त्यांना पहिल्यांदा रंग लागला. 'खोडकर बंडू' या नाटुकलीत त्यांनी खोडकर बंडूची भूमिका साकरली होती. या नाटकामुळे त्यांना अभिनयाची आवड असल्याची जाणीव झाली.
मुंबई गाठली अन् आयुष्य बदललं
गोव्यात त्याकाळी सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी पूरक वातावरण नसल्याने त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत सुरुवातीला स्वत:च्या पायावर उभं राहून काम करावं हा विचार त्यांनी केला. त्यांनी एक छोटी नोकरी केली. जयहिंद महाविद्यालयातून शिक्षण घेत असतानाच त्यांनी नोकरी केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची सुनील दत्तसोबत ओळख झाली. दोघेही एकाच बाकावर बसायचे. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी ते मराठी वाङ्मय मंडळाचे सचिव होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'लग्नाची बेडी' या नाटकात काम केलं. वेगवेगळ्या एकांकिकामध्ये त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात 'गोवा हिंदू असोसिएशन'चा मोलाचा वाटा आहे. या संस्थेत त्यांनी आधी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर 'कार्यकर्ता' म्हणून वावरले. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आणली.
मोहनदास यांची अनेक नाटकं गाजली आहेत. नाटकांप्रमाणे त्यांनी मराठी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'कैवारी', 'जावई माझा भला','चांदणे शिंपीत जा', 'थोरली जाऊ', 'वाट पाहते पुनवेची', 'जन्मदाता', 'पोरका', 'प्रेमांकुर','निवडुंग' अशा अनेक मराठी सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.
मोहनदास सुखटणकर यांच्या नाटकातील भूमिका
अंमलदार (हरभट), अखेरचा सवाल (हरिभाऊ), आभाळाचे रंग (आबा), एकच प्याला (तळीराम), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), राणीचा बाग (मनोहर), वेड्यांचा चौकोन (बंडू), लग्नाची बेडी (गोकर्ण), लेकुरे उदंड जाहली (दासोपंत), संशयकल्लोळ (भादव्या), स्पर्श (नाटेकर)
संबंधित बातम्या