(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Godavari : नाशिकच्या 'गोदावरी' नदीनं मला 'गोदावरी' सिनेमा दिलाय : प्राजक्त देशमुख
Prajakt Deshmukh : नाशिकच्या गोदावरी नदीने मला 'गोदावरी' सिनेमा दिला आहे, असं प्राजक्त देशमुख म्हणाला.
Prajakt Deshmukh On Godavari : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) 14 सिनेमांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून 'गोदावरी' (Godavari) या मराठी सिनेमाची निवड करण्यात आली आहे. याबद्दल बोलताना या सिनेमाचा संवादलेखक प्राजक्त देशमुख (Prajakt Deshmukh) म्हणाला, "शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'गोदावरी' सिनेमाची सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून निवड होणं हे खूप आनंद देणारं आहे."
प्राजक्त म्हणाला, "गोदावरी' सिनेमाचं शूटिंग गेल्या लॉकडाऊनमध्ये नाशिकमध्ये झालं आहे. आता अनेक चित्रपट महोत्सवांत या सिनेमाचं कौतुक होत आहे, ही आनंदाची बाब आहे. अनेक संकटांवर मात करत हा सिनेमा उभा राहिला आहे. त्यामुळे या सिनेमाला मिळालेलं यश हे खूप सुखावणारं आहे."
प्राजक्त पुढे म्हणाला की, "नाशिकच्या गोदावरी नदीने मला 'गोदावरी' सिनेमा दिला आहे. मला माझं शहर एका वेगळ्या पद्धतीनं दाखवता आलं, लिहिता आलं. गोदावरी नदीसोबत माझं वेगळं नातं आहे. ते नातं या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवता आलं."
View this post on Instagram
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (SCO) प्रसून जोशी आणि आर माधवन यांच्या हस्ते गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन (Nikhil Mahajan) आणि जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जितेंद्र जोशी, गौरी नलावडेसह या सिनेमाच्या टीमने या गौरवशाही सोहळ्यात हजेरी लावली होती.
चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवलेला 'गोदावरी'!
'गोदावरी' हा सिनेमा प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी (Jitendra Joshi), विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे (Gauri Nalawade) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यानंतर 'गोदावरी' या सिनेमाने सिनेमागृहातदेखील धुमाकूळ घातला.
'गोदावरी' सिनेमाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 'इफ्फी 2021' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल'मध्ये 'गोदावरी' या सिनेमाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. 'वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि 'न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये 'एशिया पॅसिफिक प्रीमिअर'ही दाखवण्यात आला आहे. 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :