(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Bajpayee On Satya Movie : पाचव्याच दिवशी थांबले होते 'सत्या'चे शूटिंग, अंडरवर्ल्डला घाबरून पळून गेला होता निर्माता, अन् मग...
Manoj Bajpayee On Satya Movie : 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्या या चित्रपटाने इतिहास घडवला. पण, शूटिंगच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाच्या निर्मात्याने पळ काढला होता.
Manoj Bajpayee On Satya Movie : भारतीय सिनेसृष्टीत गुन्हेगारी जगत, अंडरवर्ल्डवर अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांनी आपला वेगळाच ठसा उमटवला आहे. राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) दिग्दर्शित 'सत्या' (Satya Movie) हा चित्रपटही याच पठडीतील आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने इतिहास घडवला, शिवाय बॉलिवूडला अनेक दमदार कलाकार दिले. मात्र, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशीच शूटिंग बंद करावी लागली होती. अंडरवर्ल्ड जगतावर चित्रीत होणाऱ्या चित्रपटाच्या निर्मात्याने अंडरवर्ल्डच्या भीतीने पळ काढला होता.
'सत्या' या चित्रपटात भिकू म्हात्रे याची भूमिका साकारणारा अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यानेच हा किस्सा सांगितला आहे. 1997 मध्ये टी-सीरिज कंपनीचे सर्वेसर्वा, व्यावसायिक, निर्माते गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली होती. त्याचा परिणाम 'सत्या'वरही झाला. जवळपास आठवडाभर हा चित्रपटाचा क्रू चिंतेत होता असे मनोज वाजपेयीने सांगितले.
मनोज वाजपेयीने सांगितले की, गुलशनकुमारच्या हत्येनंतर 'सत्या' चित्रपटाचा पहिला मूळ निर्माता खूपच घाबरला होता. गुलशन कुमार यांची हत्या झाल्यानंतर त्याने आपला हात मागे खेचला. त्यामुळे चित्रपट अधांतरी लटकला होता. मात्र, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने हार मानली नाही. त्याने एकाच आठवड्यात दुसरा निर्माता शोधून काढला असल्याचे मनोज वाजपेयीने या मुलाखतीत सांगितले.
सुशांत सिन्हाच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना मनोज वाजपेयी यांनी मुंबईत शिफ्ट झाल्यानंतर त्यांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला हेही सांगितले. ''सत्या'' चित्रपटासाठी दीड लाख रुपये मिळाल्याचे त्याने सांगितले. मला ही डील चांगली वाटली, शिवाय ही मोठी संधी होती. नशीब बदलणार असे वाटत असतानाच गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अंडरवर्ल्डने हे कृत्य केले असल्याचे सांगण्यात आले.
मनोज वाजपेयींने सांगितले की, ज्यावेळी मला 'सत्या'मध्ये भूमिका मिळाली. त्यावेळी मी कोणालाही सांगितले नाही. माझ्या रुममेटलाही काहीच सांगितले नाही. हा चित्रपट कधीच पूर्ण होणार नाही, अशी मनात भीती होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊन पाच दिवस झाले तोच गुलशन कुमार यांची हत्या झाली. निर्माते घाबरल्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. गुलशन कुमारची हत्या ही इंडस्ट्रीतील मोठी घटना होती आणि आम्ही मुंबईच्या माफियांवर चित्रपट बनवत होतो. निर्मात्याने घाबरून चित्रपट बंद केला. नुकतीच सुरू झालेली माझी कारकीर्द अचानक ठप्प झाली.
राम गोपाल वर्माने हार मानली नाही...
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, 'एका आठवड्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी भरत शाह यांना चित्रपटाचे निर्माते म्हणून आणले. त्यानंतर पु्न्हा शूटिंग सुरू झाले. आम्ही 'सत्या' चित्रपटासाठी सर्वस्व दिले. तो एक आठवडा आमच्यासाठी खूपच कठीण, आव्हानात्मक होता. पुढे काय होणार, याची कोणालाही कल्पना नव्हती. 'सत्या' माझ्यासाठी आणि काही कलाकारांसाठी शेवटची आशा होती. तो कालावधी खूप निराशाजनक आणि अस्वस्थ करणारी होती. राम गोपाल वर्मा जोपर्यंत सांगत नाही ती सर्व काही संपले नाही, तोपर्यंत मी आशा सोडणार नाही, असे ठरवले होते. पण त्याने कधीच हार मानली नाही. त्याने फक्त एवढेच सांगितले की आता तात्पुरता काळासाठी आपण थांबत आहोत. पण, आठच दिवसांमध्ये आम्हाला चांगली बातमी मिळाली.
गुलशन कुमार यांच्या हत्येमुळेच ''सत्या'' आकाराला आला होता, असे राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या 'गन्स अँड थाईज' या आत्मचरित्रात सांगितले होते. त्यांनी अंडरवर्ल्डच्या लोकांबद्दल खोलवर विचार केला, जे या चित्रपटात दाखवण्यात आले. ''सत्या'' आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.