(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Bajpayee : शेतकऱ्याचा मुलगा कसा झाला बॉलिवूड स्टार? वाचा मनोज वाजपेयीची अंगावर शहारे आणणारी संघर्षमय कहाणी
Manoj Bajpayee : बॉलिवूडचा चतुरस्त्र अभिनेता मनोज वाजपेयी आज इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते बॉलिवूड स्टारपर्यंतचा हा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
Manoj Bajpayee : मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या तीन दशकांपासून तो प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आपल्या जबरदस्त अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. बॉलिवूडसह (Bollywood) ओटीटी विश्वातदेखील त्याला बोलबाला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या मनोजचा बॉलिवूड स्टार होण्यापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. अंगावर शहारे आणणारी त्याची स्ट्रगल स्टोरी आहे. मनोजचा जन्म 23 एप्रिल 1969 रोजी बिहारमधील एका छोट्या गावात झाला आहे. त्याचे वडील शेतकरी होते. अभिनेता होण्याचं मनोजचं बालपणीपासूनचं स्वप्न होतं. सुपरस्टार मनोज कुमार यांच्या नावावरुनच मनोज वाजपेयी यांचं नाव ठेवण्यात आलं होतं.
ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयी म्हणाला होता,"मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. पाच भावंडांसोबत बिहारमधील एका छोट्या गावात मी लहानाचा मोठा झालो. एका झोपडीसारख्या शाळेत आमचं शालेय शिक्षण झालं. सर्वसामान्य कुटुंबात माझं बालपण गेलं. त्यावेळी आम्ही जेव्हा शहरात जात असे तेव्हा चित्रपट पाहायला नक्की जायचो. वयाच्या 9 व्या वर्षीच अभिनेता होण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं".
मनोजने केलेला आत्महत्येचा प्रयत्न
मनोजचं 12 वी पर्यंतचं शिक्षण बिहारमध्ये झालं आहे. पुढे अभिनेता होण्याची इच्छा मनात ठेऊन त्याने वयाच्या 17 व्या वर्षी दिल्ली गाठलं. त्यावेळी तीनवेळा त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला. पण तिन्हीवेळा तो अयशस्वी झाला. सततच्या अपयशामुळे त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला कठीण प्रसंगातून बाहेर काढलं.
View this post on Instagram
मनोज वाजपेयीची संघर्षमय कहाणी
मनोज वाजपेयीला मुंबईत आल्यानंतर अनेक रिजेक्शन आणि संघर्षाचा सामना करावा लागला आहे. ह्यूमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत मनोज याबद्दल म्हणाला होता,"मुंबईत आल्यानंतर एका चाळीत मी पाच मित्रांसोबत भाड्याने राहत होतो. चांगल्या कामाच्या शोधात होतो. पण सगळीकडून रिजेक्शनच मिळत होतं. एकदा तर पहिल्या शॉटनंतर मला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी फक्त एक वडापाव खाऊन मी दिवस ढकलत होतो". रिजेक्शननंतरही मनोजने हार मानली नाही. तो म्हणाला,"अखेर चार वर्षांच्या संघर्षानंतर मला महेश भट्टच्या मालिकेत काम मिळालं. यात प्रत्येक एपिसोडचे मला 1500 रुपये मिळत होते. पहिल्यांदाच माझ्या कामाची दखल घेण्यात आली आणि मला पहिला बॉलिवूड चित्रपट ऑफर करण्यात आला. 'सत्या' या चित्रपटाने मला ब्रेक मिळाला.
'या' चित्रपटाने मनोजला रातोरात केलं सुपरस्टार (Manoj Bajpayee Movies)
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित क्राइम ड्रामा 'सत्या'मध्ये मनोजने भीकू म्हात्रे नामक एका गँगस्टरची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून मनोज यशाच्या शिखरावर पोहोचला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. राजनीती, अलीगढ, आरक्षण, स्वामी, स्पेशल 26 आणि शूटआऊट अॅट वडाला सारख्या अनेक हिट चित्रपटांत मनोजने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'गँग्स ऑफ वासेपुर'मधील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. चित्रपटांसह द फॅमैली मॅन, किलर सूप आणि रे सारख्या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे.
संबंधित बातम्या