Maharaj Movie Netflix : वादात अडकला, बहिष्काराचे आवाहन, तरीही आमिरच्या लेकाच्या 'महाराज'चा चित्रपटाचा डंका
Maharaj Movie Netflix : चित्रपटाला विरोध करण्यासह बहिष्काराचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ओटीटीवर रिलीज झालेल्या 'महाराज'ने विक्रमी कामगिरी केली आहे.
Maharaj Movie Netflix : बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा लेक जुनैद खान (Junaid Khan) याचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'ला वादाचे ग्रहण लागले होते. या चित्रपटाला विरोध करण्यासह बहिष्काराचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ओटीटीवर रिलीज झालेल्या 'महाराज'ने विक्रमी कामगिरी केली आहे. हा चित्रपट चार देशांमध्ये पहिल्या स्थानावर असून अनेक देशांमध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
पत्रकार, समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर आधारीत चित्रपट आहे. या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल झाली होती. कोर्टाने चित्रपटाच्या रिलीजवर स्थगितीदेखील दिली होती. त्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली.
50 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला 'महाराज'
नेटफ्लिक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, 24 जून ते 30 जूनपर्यंत 'महाराज' 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा चित्रपट भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि मालदीवमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय, बहारीन, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, केनिया, मोरोक्को आणि युरोपमध्येही या चित्रपटाला पसंती दिली जात आहे.
लोकांच्या प्रेमामुळे आनंदीत...
माझ्या पहिल्याच चित्रपटाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने आनंदी असल्याचे जुनैद खानने सांगितले. लोकांनी दिलेले प्रेम, कौतुक आणि फीडबॅकसाठी मी आभारी आहे. मी माझे निर्माते यशराज फिल्मस, माझे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा, जयदीप सर, शर्वरी, शालिनी आणि सर्व कास्ट आणि क्रू सदस्यांचे आभार मानतो असे त्याने सांगितले. आम्ही एका वेगळ्या विषयावर चित्रपट तयार केला आणि नेटफ्लिक्सने त्याला जगभरात पोहचवले. लोकांना हा चित्रपट आवडतोय याचा आनंद वाटत असल्याचे त्याने सांगितले.
जुनैद खान, जयदीप अहलावत आणि शर्वरी वाघ यांची मुख्य भूमिका या चित्रपटात आहे. हा चित्रपट 1862 मधील एका घटनेवर आधारीत गोष्ट आहे. पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजी यांच्यावर आधारीत आहे. करसनदान मुलजी यांनी त्याकाळी महिलांचे अधिकार, सामाजिक सुधारणा यासाठी महत्त्वाचे काम केले होते. मुलजी यांनी एका वैष्णव पंथाच्या प्रमुखाकडून सुरू असलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात लिखाण केले होते. त्याविरोधात मुलजी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला होता. या घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.