JNU: Jahangir National University : 'जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' या चित्रपटाचा वादग्रस्त ट्रेलर रिलीज; मराठी अभिनेता साकारतोय महत्त्वाची भूमिका
JNU: Jahangir National University : चित्रपटात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मार्क्सवादी-बहुजनवादी विचारधारा विरोधात हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्यातील संघर्ष दिसणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडके हा प्रमुख भूमिका साकारत आहे.
JNU: Jahangir National University : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेला 'जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' (JNU: Jahangir National University) चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. चित्रपटात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मार्क्सवादी-बहुजनवादी विचारधारा विरोधात हिंदुत्ववादी विचारसरणी यांच्यातील संघर्ष दिसणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हा प्रमुख भूमिका साकारत आहे.
याआधी जेएनयू या चित्रपटाच्या पोस्टरने लक्ष वेधून घेतले होते. शिक्षणासोबत विविध राजकीय, सामाजिक मुद्यांवर भाष्य ते विद्यार्थ्यांची चळवळ यासाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रसिद्ध आहे. मात्र, मागील 10 वर्षांपासून जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा आरोप सातत्याने उजव्या विचारांचे पक्ष, संघटनांकडून करण्यात आला. 'जेएनयू' या चित्रपटातही याचे प्रतिबिंब असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाशी साधर्म्य दाखवणारे वातावरण, लोगो हे 'जेएनयू: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.
डाव्यांवर निशाणा, हिंदुत्ववादांच्या नजरेतून चित्रपट?
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धारदार संवाद असून डाव्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. “ये लेफ्ट यूनिट लोंगे ने पूरे कॅम्पस को जात-पात में परिवर्तित कर दिया है (या लेफ्ट युनिटच्या लोकांनी संपूर्ण कॅम्पस जातीच्या आधारावर विभागला.) “अब हम लोग बोलेंगे भी और लडेंगे भी (आता आम्ही बोलणार देखील आणि लढणारही.)” अशा संवादांनी भरलेल्या ट्रेलरमध्ये चित्रपटातील दोन विचारांच्या संघटनांमध्ये सुरू असलेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय ट्रेलरमध्ये काही वादग्रस्त घटना, घोषणाही दाखवण्यात आल्या आहेत. विद्यार्थी राजकारणालाही काळी बाजू कशी आहे, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले असल्याचे चित्रपट निर्माती प्रतिमा दत्ता यांनी म्हटले.
महाकाल मुव्हीज प्रा. लि.चे जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी चित्रपटाचे दिग्दर्शक विनय शर्मा यांनी म्हटले की, देशाचे विभाजन करण्यासाठी देशाच्या सर्वात नाजूक समस्यांना शस्त्र म्हणून वापरण्याचे डावपेच आहेत. जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी या चित्रपटात शिक्षणाचे केंद्र हे वादांसाठीचा मंच म्हणून काम करू शकत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चित्रपटात कोणते कलाकार?
चित्रपटात अभिनेत्री उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा, रवी किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे आणि शिवज्योती राजपूत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
कधी होणार रिलीज?
“जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी” चित्रपट सेन्सर बोर्डाच्या मंजुरीनंतर 21 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.