Jhimma 2 : कोरोनानंतर आला बॉक्स ऑफिस गाजवलं... 'झिम्मा 2'चा खेळही हाऊसफुल्ल; रिलीजच्या पहिल्या दिवशी केली कोटींची कमाई
Jhimma 2 : 'झिम्मा 2' हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
Jhimaa 2 Box Office Collection Day 1 : कोरोनाकाळानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणून 'झिम्मा' (Jhimma) या सिनेमाकडे पाहिलं जातं. हिंदीचे बिग बजेट सिनेमे कोरोनानंतर प्रदर्शित करायला निर्माते घाबरत होते. त्यावेळी 'झिम्मा' हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं धाडस मराठी मनोरंजनसृष्टीने केलं. 'झिम्मा' हा सिनेमा त्यावेळी फक्त प्रदर्शित झाला नाही तर या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकण्यासोबत बॉक्स ऑफिसही जिंकलं. 'झिम्मा'नंतर या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची अर्थात 'झिम्मा 2'ची (Jhimaa 2) चाहते प्रतीक्षा करत होते. अखेर 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
'झिम्मा 2'ची ओपनिंग डे कमाई जाणून घ्या...
'झिम्मा', 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हे महिलांवर आधारित असलेले सिनेमे गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी महिलावर्गाचं मनोरंजन करण्यासोबत पुरुषमंडळींना आरसा दाखवण्याचं काम केलं. संपूर्ण कुटुंबियांनी एकत्र सिनेमागृहात जाऊन या सिनेमांचा आस्वाद घेतला. त्यानंतर 'झिम्मा 2'ची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती. आता हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, तगडी स्टारकास्ट, उत्तम कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन असं सर्व कमाल असणाऱ्या या (Jhimma 2 Opning Day Collection) सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
तगडी स्टारकास्ट असलेला 'झिम्मा 2' (Jhimma 2 Starcast)
'झिम्मा 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने (Hemant Dhome) सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने (Irawati Karnik) या सिनेमाचं लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी (Suhas Joshi), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), क्षिती जोग (Kshitee Jog), सायली संजीव (Sayali Sanjeev), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), शिवानी सुर्वे (Shivani Surve), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), अनंत जोग (Anant Jog) या अशी दमदार कलाकारांची फळी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा 'झिम्मा 2'
‘झिम्मा' मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता आला. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव 'झिम्मा'ने करून दिली. हेच 'स्वत्त्व' शोधायला लावणारा हा सिनेमा पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला आला आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा आहे.
'झिम्मा'मधून या मैत्रिणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता 'झिम्मा 2'मधून या मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. त्यात या ताफ्यात आता आणखी दोन मैत्रिणी सामील झाल्या आहेत. त्यामुळे आता धमालही दुपटीने वाढली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाला सिनेरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आता वीकेंडला हा सिनेमा आणखी कमाई करू शकतो.
संबंधित बातम्या