Jayant Sawarkar : मनोरंजसृष्टीतील एका पर्वाचा अंत; ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर अनंतात विलीन
Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे 24 जुलै 2023 रोजी निधन झाले असून त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jayant Sawarkar Passed Away : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. 24 जुलै 2023 रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांच प्राणज्योत मालवली. दरम्यान जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय, जवळचा मित्रपरिवार आणि मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होते. जयंत सावरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आणि एक मुलगा, सून असा परिवार आहे.
जयंत सावरकर यांचे पार्थिव ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. दरम्यान मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होते. यावेळी शोक व्यक्त करत सुबोध भावे म्हणाला,"जयंत सावरकर यांनी रंगभूमीवरील सर्व वयोगटातील कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे.. एक इतिहास संपला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो". तर मंगेश देसाई म्हणाला,"अण्णा आम्हालाही लाजवणारे होते. फिटनेसवर नेहमीच लक्ष देण्यास सांगणारे म्हणजे अण्णा".
जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी खास पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. चित्रपट, नाटक, मालिका अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणारं हे अभिनयाचं व्यासपीठ काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठेवण्यात आले होते.
जयंत सावरकर यांच्याबद्दल जाणून घ्या... (Jayant Sawarkar Details)
जयंत सावरकर यांनी 70 वर्ष मराठी रंगभूमीवर काम केलं आहे. मराठीसह हिंदी मालिका, सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये त्यांनी काम केलं आहे. 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.'एकच प्याला, 'अवध्य', 'तुज आहे तुजपाशी', 'दिवा जळू दे सारी रात', 'वरचा मजला रिकामा', 'सूर्यास्त', 'व्यक्ती आणि वल्ली', 'हिमालयाची सावली' या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.
'मी एक छोटा माणूस' हे संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारं जयंत सावरकर यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. विष्णुदास भावे पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. 'एकच प्याला' नाटकातील त्यांची तळीरामांची भूमिका चांगलीच गाजली आहे. विनोदीसह गंभीर भूमिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. काही महिन्यांपूर्वीच 'आई कुठे काय करते' या छोट्या पडद्यावरील मालिकेत ते दिसले होते. 'समांतर' या वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं आहे.