(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jawan Ticket Price : 'जवान'ची बंपर ऑफर; फक्त 60 रुपयांत थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट
Jawan Movie : शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Shah Rukh Khan Jawan Ticket Price : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमाच्या रिलीजला आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. किंग खानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'जवान' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत या सिनेमाचे 6,83,194 तिकीट विकले गेले असून सिनेमाने 19.68 कोटींची कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी 2000 रुपये या सिनेमाचं तिकीट असल्याचं म्हटलं जात होतं पण आता 60 रुपयांतही या सिनेमाचं तिकीट मिळत असल्याचं समोर आलं आहे.
'जवान' या सिनेमाचं तिकीट 2000 रुपयांत मिळत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण एका सिनेमागृहात तर फक्त 60 रुपयांमध्ये 'जवान' या सिनेमाचं तिकीट मिळत आहे. तर अपर सर्कलसाठीच्या तिकीटाची किंमत 80 रुपये आहे. कोलकातातील बासासात येथील लाली सिनेमागृहात आणि पद्मा थिएटरमध्ये प्रेक्षक 60 रुपयांत हा सिनेमा पाहू शकतात. तर काही ठिकाणी 100-150 रुपयांत हा सिनेमा प्रेक्षक पाहू शकतात.
दिल्ली-मुंबईत राहणाऱ्या शाहरुख खानच्या चाहत्यांना 'जवान' हा सिनेमा पाहण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. काही सिंगल-स्क्रीनमध्ये 'जवान' हा सिनेमा चाहते 75 रुपयांत पाहू शकतात. तर मुंबईतील डोंगरी येथील प्रीमियर गोल्ड थिएटरमध्ये या सिनेमाच्या तिकीटाची किंमत 100 रुपये आहे. तर ड्रेस सर्कल सीटांची किंमत 112 रुपये आहे. तर काही ठिकाणी 2400 रुपयांतही 'जवान'चं तिकीट मिळत आहे.
View this post on Instagram
'जवान' कधी प्रदर्शित होणार? (Jawan Released Date)
शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खानसह (Shah Rukh Khan), नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रतीक्षा आहे. या सिनेमातील गाणीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. 'जवान'च्या रिलीजआधी शाहरुख तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेला आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे.
संबंधित बातम्या