Irrfan Khan : आतून जळताना तो बाहेर आनंद शोधत होता..!
Irrfan Khan : इरफान खानचा मुलगा बाबिलने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत काही आठवणी शेअर केल्या आहेत. बाबिलनं शेअर केलेल्या या आठवणीमुंळे प्रत्येकाच्यात डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई : इरफान खान.. गेल्या वर्षी एकिकडे भारतात कोरोनाने उच्छाद मांडायला सुरुवात करायला आणि एप्रिलच्या अखेरीस इरफान गेल्याची वेदनादायी बातमी यायला एकच गाठ पडली. या घटनेला आता एक वर्षं होतंय. इरफान खान यांच्या जाण्याचं दु:ख प्रत्येकाला आहे. पण आज सकाळी त्याचा मुलगा बाबिलने इन्स्टावर ज्या दोन गोष्टी शेअर केल्या त्या पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रत्येक संवेदनशील माणसाचं मन हेलावून गेलं.
बाबिलने आपल्या वडिलांच्या दोन आठवणी सांगितल्या आहेत. त्यापैकी एका पोस्टमध्ये त्याने वडिलांनी लिहिलेलं एक पत्र दिलं आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये लंडनमध्ये केमो थेरपी घेत असताना इरफान स्वत:चं टेबल, खुर्ची स्वत: बनवत असे. त्याचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये बाबिल आपल्या वडिलांबद्दल लिहिताना म्हणतो, "लंडनमध्ये सुरु असलेल्या केमो थेरपीमुळे तू आतून जळत होतास. पण बाहेर छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधत होतास. तुझ्या तुझ्या गोष्टी लिहिण्यासाठीचं टेबल, खुर्ची तुझी तुला बनवायची असायची. त्यात एक प्रकारचा सच्चेपणा होता. जो मी अजूनही शोधतोय. एक पूर्णविराम. त्याची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. कुणालाही ते शक्य होणार नाही. एक उत्तम मित्र, उत्तम बाप, उत्तम सहकारी.. मला तुझी खूप उणीव भासते. खूप म्हणजे शहाजहान-मुमताजपेक्षाही जास्त. या अवकाशात मीही एक स्मृतिशिल्प बांधेन. पण त्या अवकाशातल्या कृष्णविवरात आपण जाऊ... तुला कायम त्याचं आकर्षण होतं. पण इथे मला तुझ्यासोबत जायचं आहे. आणि एकमेकांचे हात हातात घेत आपण पुढे चालत राहू.

बाबिल आणि इरफान यांचं एकमेकांशी असलेलं नातं अतिशय मोकळं होतं. बाबिलच्या अनेक पोस्टमधून ते दिसतं. त्याच्या वडिलांनी त्याला लिहिलेली पत्र असोत किंवा या दोघांमध्ये झालेला संवाद असो. इरफान खान आपल्या शेवटच्या दिवसातही बाबिलसोबत बोलला होता. बाबिलने एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे. अनुपमा चोप्रा यांच्यासोबतच्या मुलाखतीत बाबिल म्हणतो, बाबा जायच्या आधी तीन चार दिवस मी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी त्यावेळी माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, मी मरणार आहे. मी म्हणालो, नाही. तू नाही मरणार. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. स्मितहास्य केलं आणि ते डोळे मिटून पडून राहिले.
बाबिल.. त्याची आई सुतापा आणि इरफान यांचं त्रिकोणी कुटुंब अत्यंत वेगळा विचार घेऊन पुढे जाणारं कुटुंब होतं. इरफान यांनी इगतपुरीजवळ एक फार्महाऊसही घेतलं होतं. इगतपुरीजवळच्या त्रिलंगवाडी फोर्टजवळ हे फार्महाऊस होतं. हे बांधल्यानंतर इरफानने जवळच्या लोकांना मोठी मदत देऊ केली होती. या गावाला एक रुग्णवाहिका दिली. मुलांना पुस्तकं दिली. शाळेचा एक आराखडा तयार करुन दिला. आपल्या लिखाणासाठी आपली खुर्ची आणि आपलं टेबल स्वत: बनवणारा इरफान दुसऱ्यालाही जमेल तेवढी मदत करू पाहात होता. म्हणूनच त्या गावातल्या लोकांनी या वाडीचं नाव हिरोची वाडी असंही केलं. इरफान गेल्यानंतर त्यांनी त्याचं नामकरण केलं. त्याची आठवण राहावी म्हणून त्या गावाला इरफानच्या नावाची कमानही तयार करण्यात येणार होती. पण प्रत्येकजण लॉकडाऊन निघण्याची वाट पाहात होता.
जमेल तशी मदत करणारा हिरोच अचानक गेल्यामुळे गावाला नव्याने फुटलेले पंखही अचानक शक्तीहीन बनले. इरफानची पोकळी सिनेविश्वात तर जाणवणारी आहेच. पण त्याही पलिकडे त्याच्यासारख्या लोकांची समाजात असलेली उणीव ही हिरोची वाडी अधिक अधोरेखित करणारी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Irrfan Khan : प्रथम स्मृतीदिनी जाणून घेऊया इरफान खान यांची कधीही न पाहिलेली बाजू























