International Women’s Day 2023: मनोरंजन क्षेत्रात महिलांचा डंका; जाणून घ्या पहिल्या महिला दिग्दर्शिका आणि अभिनेत्रीबाबत...
जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day) अशा महिलांबाबत जाणून घेऊयात, ज्यांनी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेऊन इतर लोकांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
International Women’s Day 2023: आज 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) जगभरात उत्साहानं साजरा केला जात आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा अनेक क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. महिलांच्या कामगिरीचा गौरव जागतिक महिला दिनाला केला जातो. अनेकांचे असे मत होते की, मनोरंजनक्षेत्र 'मेन डॉमिनेटिंग' क्षेत्र आहे. काही लोकांनी मनोरंजन क्षेत्रात महिला आणि पुरुष यांना मिळणाऱ्या मानधनाच्या फरकाबाबत देखील आवाज उठवला होता. पण आज जागतिक महिला दिनानिमित्त अशा महिलांबाबत जाणून घेऊयात, ज्यांनी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेऊन इतर लोकांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.
मार्गारेट ह्यूजेस
अभिनेत्री मार्गारेट ह्युजेस पेग ह्युजेस या नावानं देखील ओळखल्या जात होत्या. 29 मे 1630 रोजी जन्मलेल्या मार्गारेट या पहिल्या इंग्लिश स्टेज प्रोफेशनल अॅक्ट्रेस आहेत. 8 डिसेंबर 1660 रोजी त्यांनी पहिल्यांदा परफॉर्म केलं. त्यांनी विल्यम शेक्सपियर यांच्या ऑथेलो या नाटकामध्ये डेस्डेमोना ही भूमिका साकारली होती. तसेच द आइसलँड प्रिंसेस या नाटकामध्ये देखील त्यांनी काम केलं.
भारतातील पहिल्या महिला अभिनेत्री
दुर्गाबाई कामत या भारतातील पहिल्या महिला अभिनेत्री आहेत. त्यांनी 1913 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहिनी भस्मासूर या चित्रपटात पार्वती ही भूमिका साकारली होती. 1900 च्या सुमारास, चित्रपटांमध्ये महिला काम करत नव्हत्या. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे त्यांच्या चित्रपटात पुरुष हे महिलांच्या भूमिका साकारत होते. पण दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या मोहिनी भस्मासूर या चित्रपटात दुर्गाबाई कामत यांना काम करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला. मोहिनी भस्मासूर चित्रपटात दुर्गाबाई कामत यांची मुलगी कमलाबाई हिने देखील बालकलाकाराची भूमिका साकारली. कमलाबाई ही भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली महिला बालकलाकार आहे.
अॅलिस गाय-ब्लॅचे
अॅलिस गाय-ब्लॅचे या फ्रेंच पायनियर फिल्ममेकर होत्या. काल्पनिक कथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांपैकी त्या एक होत्या. तसेच त्या पहिल्या महिला दिग्दर्शिका आहेत. 1896 ते 1906 या काळातील त्या जगातील एकमेव महिला चित्रपट निर्मात्या होत्या, असंही म्हटलं जातं. फातिमा बेगम या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला दिग्दर्शक होत्या. 'बुलबुल ए परिस्तान' हा त्यांचा पहिला चित्रपट 1926 मध्ये रिलीज झाला होता.
हेलन गार्डनर
हेलन गार्डनर या स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनी स्थापन करणाऱ्या पहिल्या महिल्या होत्या, असं म्हटलं जातं. "द हेलन गार्डनर पिक्चर प्लेअर्स" ही चित्रपट निर्मिती कंपनी त्यांनी स्थापन केली. 1912 मध्ये रिलीज झालेला क्लियोपात्रा हा चित्रपट "द हेलन गार्डनर पिक्चर प्लेअर्स" कंपनीनं निर्मिती केलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात हेलन गार्डनर यांनी अभिनय देखील केला होता.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
International Women’s Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्त गूगलचं डूडल; पाहा काय आहे खास?