Chhello Show Release : चिमुकल्यांच्या स्वप्नांची कथा सांगणारा ‘छेल्लो शो’ देशभरात प्रदर्शित होणार! जाणून घ्या चित्रपटाच्या कथेविषयी...
Chhello Show : ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेला 'छेल्लो शो' (Chhello Show) हा चित्रपट आज (14 ऑक्टोबर) देशभरात रिलीज होणार आहे.
Chhello Show : ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेला 'छेल्लो शो' (Chhello Show) हा चित्रपट आज (14 ऑक्टोबर) देशभरात रिलीज होणार आहे. ऑस्कर नामांकन निवडीत प्रवेश मिळवल्यापासून हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटात असं काय खास आहे, ज्यामुळे त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले गेले आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. भल्याभल्या चित्रपटांना मात देत ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने हा बहुमान पटकावल्याने चित्रपटाचे कौतुक देखील होता आहे. प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेला हा चित्रपट आज सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.
नुकतेच मुंबईत या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग पार पडले. याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. तर, यावेळी चित्रपटातील कलाकार देखील उपस्थित होते. सर्वांनीच या चित्रपटाचे आणि त्यातील कलाकारांचे कौतुक केले आहे.
काय आहे चित्रपटाचं कथानक?
एका नऊ वर्षांच्या मुलाच्या ध्येयवेडाचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. खेडेगावात राहणारा ‘समय’ नावाचा एक मुलगा एकदा चित्रपट पाहतो आणि त्याला चित्रपट नेमका बनतो कसा, हे जाणून घेण्याचा ध्यास लागतो. आपणही चित्रपट बनवायचा हे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी असणाऱ्या या समयने या चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अगदी कमीत कमी संवाद वापरत केवळ दृश्यांच्या आणि प्रकाशाच्या माध्यमातून ही कथा सादर करण्यात आली आहे. आपलं स्वप्न केवळ आपलं नसतं, तर त्यात इतरांनाही सामील करून घेण्यात एका वेगळाच आनंद असतो, हे त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसतं.
‘छेल्लो शो’ या गुजराती भाषिक चित्रपटाने आजवर अनेक चित्रपट पुरस्कारांत बाजी मारली आहे. लॉकडाऊन दरम्यान चित्रपट आल्याने तो प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकलेला नाही. ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला होता. त्यानंतर अनेक पुरस्कार सोहळ्यात हा चित्रपट दाखवण्यात आला. पान नलिन यांच्या या चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
‘या’ बालकलाकारासाठी ठरला शेवटचा चित्रपट!
'छेल्लो शो' चित्रपटात सहा बाल कलाकारांनी भूमिका साकारली आहे. यापैकी ‘मनू’ ही भूमिका साकारणाऱ्या 15 वर्षांच्या राहुल कोलीने नुकताच या जगाचा निरोप घेतला. राहुलला कॅन्सरची लागण झाली होती. मात्र, या आजाराशी त्याची झुंज अपयशी ठरली. राहुलच्या मृत्यूपूर्वी त्याला वारंवार ताप येत होता आणि त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या. ‘छेल्लो शो’ रिलीज होण्याआधीच या बालकलाकाराने या जगाचा निरोप घेतला.
हेही वाचा :
Chhello Show : ‘छेल्लो शो’, प्रकाश ओंजळीत भरण्याची स्वप्न पाहणाऱ्या ‘समय’ची कथा!
Rahul Koli: 'छेल्लो शो' चित्रपटातील बालकलाकाराचे निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी