(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Har Har Mahadev: हर हर महादेव चित्रपटाच्या वादावर शरद पोंक्षे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा मुर्खपणा...'
शरद पोंक्षे यांनी (Sharad Ponkshe) 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
Har Har Mahadev: सध्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरुन राजकारण पेटलं आहे. राजकीय पक्षांसह अनेक संघटनांकडून या सिनेमाला विरोध होत आहे. 'हर हर महादेव' सिनेमात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. यावर आता अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे हिंदू महासभेच्या वतीने शरद पोंक्षे याना क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदूत्व शॉर्या पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी पोंक्षे बोलत होते .
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पोंक्षे यांनी 'हा मुर्खपणा आहे. सिनेमा सेन्सॉर झाला आहे. मी त्या चित्रपटात काम केलं आहे. सेन्सॉरला आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे दिले आहेत. चित्रपटात इतिहासाची कोणतीही मोडतोड झालेली नसून याबाबत आक्षेप घेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना चित्रपटाचे दिग्दर्शक भेटणार आहेत. चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतर हे लोकांना सुचतं का? सत्ता गेलेली आहे म्हणून पब्लिसिटीसाठी हे सगळं लोक करत आहेत. चित्रपटात काहीही मोडतोड करण्यात आलेली नाही. अभिजित देशांपेड यांनी अभ्यास करुन चित्रपटाची स्क्रिप्ट केली आहे.'
'सिनेमा चालू असतात लोकांना मारणं हा हलकटपणा आहे. तुम्ही गुंड आहात का? या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर सिनेमा बघणाऱ्यांना नाही का? ' असंही यावेळी शरद पोंक्षे यांनी सांगितलं.
हर हर महादेव हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केलं आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, ,अमृता खानविलकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. त्यानंतर त्याच ठिकाणी मनसेनं या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन केलं आहे.
शरद पोंक्षे यांनी ‘ठिपक्यांची रांगोळी’ , ‘उंच माझा झोका’, ‘असे हे कन्यादान’, ‘राधा ही बावरी’ अशा अनेक मालिकांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकातील त्यांची नथुरामची भूमिकाही प्रचंड गाजली होती. शरद पोंक्षे यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्यांचं दुसरे वादळ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: