Happy Birthday Nushrratt Bharuccha : टीव्ही मालिकांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता मोठा पडदा गाजवतेय अभिनेत्री नुसरत भरुचा!
Nushrratt Bharuccha Birthday : नुसरतने टीव्ही मालिकांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. मात्र, चित्रपटांमध्ये झळकल्यावर अभिनेत्रीला अधिक लोकप्रियता मिळाली.
Nushrratt Bharuccha Birthday : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) आज (17 मे) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. नुसरतने 'जय संतोषी माँ' या चित्रपटातून बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. नुसरत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले होते. मात्र, आता ती बॉक्स ऑफिसवर कल्ला करत आहे.
'लव्ह, सेक्स और धोका', 'प्यार का पंचनामा' सारख्या चित्रपटातून नुसरत भरुचाला खरी ओळख मिळाली होती. नुसरतने टीव्ही मालिकांमधून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. मात्र, चित्रपटांमध्ये झळकल्यावर अभिनेत्रीला अधिक लोकप्रियता मिळाली.
मालिका विश्वातून कारकिर्दीची सुरुवात!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीमधून केली होती. ती 2002 मध्ये झी टीव्हीच्या 'किटी पार्टी' या सीरियलमध्ये दिसली होती. यानंतर तिने सोनी वाहिनीवरील 'सेव्हन' या मालिकेतही काम केले. 'किटी पार्टी' मालिकेतमधली तिची भूमिका अगदी छोटीशीच होती. तर, 'सेव्हन’ या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेत ती एका ‘सुपर पॉवर गर्ल’च्या पात्रात दिसली होती.
चित्रपटांतून मिळवली प्रसिद्धी
नुसरत भरुचाने 2011 मध्ये कार्तिक आर्यनसोबत लव रंजन दिग्दर्शित 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाने खूप प्रसिद्धी मिळवली. हे तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश होते. या चित्रपटातील तिची कार्तिकसोबतची केमिस्ट्री चर्चेची ठरली होती. यानंतर त्यांचा 'प्यार का पंचनामा 2' हा चित्रपट देखील हिट ठरला.
'प्यार का पंचनामा' नंतर नुसरत 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. कार्तिक आर्यनसोबतचा हा तिचा 100 कोटींचा गल्ला पार करणारा पहिला चित्रपट होता. त्याच वेळी, 2018 मध्ये आलेल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटातील तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले. यानंतर 2020 मध्ये OTT वर प्रदर्शित झालेला 'छलांग'ही प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.
... म्हणून अभिनेत्री सोडला मांसाहार!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुसरतने 2013 मध्ये रिलीज झालेल्या तिच्या 'आकाश वाणी' या चित्रपटासाठी मांसाहार पूर्णपणे सोडून दिला होता, कारण या चित्रपटातील तिच्या पात्राची तशी गरज होती. मात्र, यानंतर अभिनेत्रीला वैयक्तिक जीवनातही शाकाहाराचे महत्त्व पटले आणि तिने पूर्णपणे शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा :
- Chhupe Rustam : रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
- Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स!