Happy Birthday Amruta Khanvilkar : नटखट नखऱ्याची नार 'चंद्रा'; आपल्या अभिनयासोबतच नृत्यानं सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती अमृता खानविलकर!
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) आज वाढदिवस आहे. नटखट नखऱ्याची नार 'चंद्रा' म्हणून अमृता ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस अमृताची लोकप्रियता वाढत चालली आहे.
अमृताचे गाजलेले सिनेमे :
अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे. 'कट्यार काळजा घुसली', 'शाळा', 'साडे माडे तीन', 'चोरीचा मामला' आणि 'चंद्रमुखी' या मराठी सिनेमांसह तिने 'राझी', सत्यमेव जयते आणि 'मलंग' सारख्या हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती.
सिनेमांसह छोटा पडदा गाजवलेली अमृता!
2016 साली 'कॉमेडी नाइट्स बचाओ' सारखा छोट्या पडद्यावरील कार्यक्रमदेखील केला. त्यानंतर 2017 साली तिने 'डान्स इंडिया डान्स 6' होस्ट केला. अमृता 2015 साली 'झलक दिखला जा' आणि 2020 मध्ये 'खतरों के खिलाडी 10' सारख्या रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये ती सहभागी झाली. 2017 साली '2 मॅड' आणि 2018 साली 'सूर नवा ध्यास नवा' सारख्या कार्यक्रमांचं तिने परिक्षण केलं.
अमृताला 'वाजले की बारा' कसं मिळालं?
रवी जाधवच्या 'नटरंग' या बहुचर्चित सिनेमातील 'वाजले की बारा' या गाण्यामुळे अमृता खानविलकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण या गाण्यासाठी अमृता पहिली पसंती नव्हती. या गाण्यासाठी एका वेगळ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. पण काही कारणास्तव तिला हा सिनेमा करणं जमलं नाही . त्यामुळे या गाण्याच्या शूटिंगच्या एक दिवस आधी अमृताला विचारणा झाली. या गाण्यामुळे अमृताला घराघरांत लोकप्रियता मिळाली.
अमृताची लव्हस्टोरी खास!
अमृताचे खानविलकरचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यात झाला. त्यानंतर तिचे शिक्षण मुंबईत झाले. अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हादेखील अभिनेता आहे. तो अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसून आला आहे. 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमादरम्यान अमृता आणि हिमांशूची भेट झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अमृता आणि हिमांशू 10 वर्षे एकमेकांना डेट करत होते. 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते 24 जानेवारी 2015 साली लग्नबंधनात अडकले. आजही त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा मैत्रीचं नातं आहे. दोघेही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.
संबंधित बातम्या