Gautami Patil : लावणी नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली, गौतमी पाटीलमुळे लावणी भ्रष्ट : डॉ. गणेश चंदनशिवे
Dr. Ganesh Chandanshive on Gautami Patil : लोककलेचा प्रचार करणारे मुंबई विद्यापाठीच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटील आणि तिच्या नृत्यप्रकाराबद्दल भाष्य केलं आहे.
Dr. Ganesh Chandanshive on Gautami Patil : गौतमी पाटील (Gautami Patil) लावणी करत नाही तर ती आयटम साँग करते. लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली असल्याचं मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे हे सिनेपत्रकार अमोल परचुरे यांच्या 'कॅच अप' या शोमध्ये म्हणाले. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी तमाशाप्रधान चित्रपटातील तमाशाचं चित्रण, तंबूतल्या अस्सल तमाशाची आजची स्थिती, लोकशाहीरांचं योगदान, लोककला अकादमीमधून सुरू असलेला लोककलेचा प्रचार, बॉलिवूडचा अनुभव अशा विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
सिनेपत्रकार अमोल परचुरे यांच्या 'Catch Up' या कार्यक्रमात नुकतीच डॉ. गणेश चंदनशिवे यांनी हजेरी लावली. तमाशाप्रधान चित्रपटात तमाशा नसतो. चित्रपटात जशी सोनाली कुलकर्णी दाखवण्यात आली आहे. तशी बोर्डावर दाखवता येत नाही, असं डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले.
लावणी कोणामुळे भ्रष्ट झाली?
गौतमी पाटली आणि तिच्या नृत्यप्रकाराबद्दल बोलताना डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले की,"मध्यंतरी गौतमी पाटीलसारखी मुलगी आली. मुळात गौतमी लावणी करत नसून आयटम साँग करते. लोकांनी ते लावणीवर खपवलं आहे. त्यामुळे लावणी भ्रष्ट झाली. ज्या लावणीमुळे एवढा मोठा इतिहास दिला आहे. त्या लावणीला कुठेतरी एक डाग लागल्यासारखा झाला. पुढे तिच्यावर टीका होऊ लागली तेव्हा तिने स्वत: मान्य केलं की ती लावणी करत नाही".
डॉ. गणेश चंदनशिवे पुढे म्हणाले की,"लावणीला मोठी परंपरा आहे. लावणीला शकुबाई, कोल्हापूरकर बाई, लक्ष्मी बाई, यमूना बाईंची परंपरा आहे. डोईवरचा पदर ढळू न देता सुलोचना बाईंनी रजत पटावर लावणी गायली आहे. तुम्ही आयटम साँग करताय, स्टेजवर एकदम पाण्याचे फवारे टाकताय, त्यात तुम्ही कसे दिसता याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं की अशीच परंपरा आहे. त्यातून आमच्यासारखे लोक मार्ग काढत चालले आहेत. मुंबईतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना मला सांगायचंय लावणी करा. परदेशातील मुलींना घेऊन लावणी केलीत तरी चालेल पण त्यात पारंपारिक फडावरील मुली असतील तर ते भरुन निघेल. लावणी कधी अर्धनग्न नाही. ती नखापासून केसापर्यंत शृंगाराने सजलेली आहे. तिची चोळी स्लिव्हलेस नाही. तिची पाठ दिसत नाही. तिच्या कंबरेला पट्टा असतो. कासोट्याचं तिचं पातळ आहे. पायात पाच-पाच किलोचे घुंगरू आहेत. ही लावणीची संस्कृती आपण जपली पाहिजे".
संबंधित बातम्या