Kedar Shinde : लालबागच्या राजाच्या चरणी गेलो, साकडं घातलं अन् वर्षभरातच इच्छापूर्ती; बाप्पा पाठीशी नाहीतर सोबत : केदार शिंदे
Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पा आणि केदार शिंदे (Kedar Shinde) यांचं नातं लहानपणापासूनच आगळंवेगळं आहे.
Kedar Shinde On Kalavantancha Ganesh : देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आणि गणपती बाप्पाचं नातंदेखील खास आहे.
एबीपी माझाशी बाप्पाबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले,"गणपतीचं आणि माझं नातं हे लहानपणापासूनच एकदम आगळंवेगळं आहे. गणेशोत्सवापासूनच माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या कॉलनीतील गणेशोत्सव मंडळातील कार्यक्रमाच्या माध्यमातून मी रंगमंचावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यामुळे गणरायाच्या आशीर्वादाने माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. एकंदरीतच बाप्पासोबतचं नातं पहिल्यापासून घट्ट आहे आणि ते कायम राहील".
केदार शिंदेंच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. 2010 पासून त्यांच्या घरी बाप्पा येत आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले,"मी जिथे राहत होतो त्यापेक्षा थोडी मोठी जागा मला हवी होती. लालबागच्या राजाकडे (Lalbaugcha Raja 2023) मी इच्छा व्यक्त केली होती. राजाला मी सांगितलं की,"माझ्याच बिल्डिंगमध्ये जर मला थोडी मोठी जागा मिळाली तर मी प्रतिष्ठापणा करेल आण त्याचवर्षी मला हवं असलेलं मोठं घर माझ्याच बिल्डिंगमध्ये मला मिळालं. त्यावर्षीपासून आम्ही गणपती बसवायला सुरुवात केली. सलग 10 वर्ष आमच्याकडे लालबागच्या राजाची प्रतिकृती यायची. मूर्तीकार संतोष कांबळी ही मूर्ती बनवायचे. पण कोरोनानंतर आम्ही शाडूची मूर्ती आणायला लागलो. लोअर परळला राहणारे मूर्तीकार विशाल शिंदे यांच्याकडून आता आम्ही बाप्पाची मूर्ती घेतो. यावर्षी आमच्या नव्या घरात बाप्पा विराजमान झाला".
केदार शिंदेंनी बाप्पाचे मानले आभार
बाप्पाबद्दल बोलताना केदार शिंदे पुढे म्हणाले," सिद्धिविनायकावर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा मला वेळ मिळेल तसा त्याच्या दर्शनाला जातो. बाप्पा माझ्यासोबत आहे, असं मला वाटतं. बाप्पाकडे किंवा स्वामींकडे आपण कोणतीही गोष्ट फक्त मागतोय. पण त्याचे कधीतरी आभार मानायचे असतात, असं मला माझ्या लेकीने अर्थात सनाने सांगितलं. त्यामुळे नव्या घरात बाप्पा आल्यावर आम्ही सर्वांनी मिळून त्याचे आभार मानले. 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir), 'बाईपण भारी देवा'चं (Baipan Bhaari Deva) यश, नव्या घरात पाऊल त्यामुळे असं वाटतं की बाप्पा पाठीशी नाही तर सोबत आहे. गणपती बाप्पा ज्या घरात आहेत त्या घरात आम्ही तिघे राहतो, असं मला वाटतं".
केदार शिंदे म्हणाले,"सध्या जागरूक राहण्याची खूप गरज आहे. पर्यावरणपूरक सण आपण साजरे केले पाहिजे. निसर्गाला किंवा वातावरणाला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचता कामा नये. आपण आता सुधारलो नाही तर येणारा काळ अत्यंत कठीण काळ असले. पुढील पिढ्या आपल्याला अजिबात माफ करणार नाहीत. त्यामुळे मी सर्वांना आव्हान करतो की, माझ्यापासून मी सुरुवात केली आहे. पण पर्यावरणपूरक पद्धतीनेच आपण सण साजरे करायला हवेत".
संबंधित बातम्या