Anushka Sharma: अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका; विक्री कर विभागाच्या थकबाकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली
विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता अनुष्काची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) हायकोर्टानं दणका दिला आहे. 2012-13 आणि 2013-14 मधील थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने (Sales Tax Department) बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाकल केली होती. आता अनुष्काची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं अनुष्काला दिले आहेत. तिथं दिलासा नाही मिळाला तर पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली आहे. लवादाची व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात का आलात? असा सवाल हायकोर्टनं अनुष्काला विचारला आहे. विक्रीकर विभागाचा युक्तिवाद हायकोर्टानं मान्य केला आहे.
काय आहे प्रकरण?
2012-13 आणि 2013-14 मधील थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसविरोधात अनुष्काने याचिका दाखल केली. दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं आहे. यातील एका याचिकेवर बुधवारी (29 मार्च) न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तर दुस-या याचिकेवर आज हायकोर्टात सकाळच्या सत्रात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये हायकोर्टानं विक्रीकर विभागाचा युक्तिवाद मान्य केला आहे. अनुष्काची याचिका फेटाळा, अशी मागणी विक्रीकर विभागानं हायकोर्टाकडे केली होती.
अनुष्कानं यापूर्वी या प्रकरणी आपल्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र अनुष्का ही स्वतः याचिका का दाखल करत नाही?, एखाद्या व्यक्तीनं कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही. असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर ती याचिका मागे घेऊन पुन्हा नव्यानं याचिका दाखल करण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली होती.
अनुष्का रुपेरी पडद्यावर करणार पुनरागमन
2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. अनुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. लवकरच अनुष्काचा चकदा एक्सप्रेस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्म यांनी केली आहे. अनुष्काच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
