छातीत दुखू लागल्यानं अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणतात...
Annu Kapoor Hospitalized: प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Annu Kapoor Hospitalized: प्रसिद्ध गायक आणि अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांना दिल्लीतील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) अन्नू कपूर यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर संजय स्वरूप यांनी अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितलं की, अन्नू कपूर (Annu Kapoor Health Update) यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अन्नू कपूर यांच्या मॅनेजरनं एबीपी न्यूजला माहिती देताना म्हटलं की, अन्नू कपूर यांना छातीत दुखत होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, कंजेशन होतं, म्हणूनच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि गायक अन्नू कपूर यांना 26 जानेवारीला सकाळी अचानक छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्यांना तात्काळ दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) दाखल करण्यात आलं. डॉ. अजय (चेयरमन बोर्ड ऑप मॅनेजमेंट) यांच्या मते, कपूर यांना छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर कार्डिओलॉजीचे डॉक्टर उपचार करत आहेत. यावेळी अन्नू कपूरची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व अन्नू कपूर
अन्नू कपूर अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेतच पण, त्यासोबतच एक अप्रतिम गायकही आहेत. याशिवाय, ते दिग्दर्शक, रेडिओ जॉकी आणि टीव्ही होस्टही आहेत. त्यांनी 100 हून अधिक चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. यासोबतच ते एका प्रसिद्ध टीव्ही शोचाही भाग होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि टीव्ही अकादमी पुरस्कार जिंकले आहेत.
अन्नू कपूर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 रोजी भोपाळमध्ये झाला. अन्नू कपूर यांचे वडील मदनलाल कपूर पंजाबी होते. त्यांची आई कमला या बंगाली होत्या. अन्नू कपूर यांचे वडील एक पारशी थिएटर कंपनी चालवत असतं, जी शहरा-शहरात जाऊन गल्लीबोळात नाटकं सादर करायची. तर, त्यांची आई कवयित्री होती. तसेच, त्यांना शास्त्रीय नृत्याची आवड होती. कुटुंब खूप गरीब होतं. अन्नू कपूर आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत अन्नू कपूर लहानपणीच वडिलांच्या थिएटर कंपनीत रुजू झाले. त्यानंतर अन्नू कपूर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. कधी अभिनेता म्हणून, तर कधी गायक म्हणून अन्नू कपूर यांनी प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं.