Ashok Patki : 'श्यामची आई'च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज
Ashok Patki : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की 'श्यामची आई' सिनेमातील गीतांना स्वरसाज चढवणार आहेत.
Ashok Patki : मागील बऱ्याच दिवसांपासून 'श्यामची आई' (Shyamchi Aai) या आगामी सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांच्या मनात या सिनेमाबाबत कुतूहल आहे. 'श्यामची आई'चा उल्लेख होताच सर्वप्रथम आठवतात ते साने गुरूजी... त्यासोबतच मनात रुंजी घालू लागतात साने गुरुजींच्या लेखणीतून अवतरलेली अजरामर गाणी... ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यानंतर आजच्या रंगीबेरंगी युगात पुन्हा एकदा त्याच काळात नेणारा 'श्यामची आई' हा सिनेमा तयार होत असल्यानं यातील गीत-संगीताची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात येणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. आता यावरून पडदा उठला असून, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) या सिनेमातील गीतांना स्वरसाज चढवणार आहेत.
अमृता फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या अमृता अरुण राव 'श्यामची आई'ची निर्मिती करत आहेत. आजवर बऱ्याच महत्त्वकांक्षी चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक सुजय डहाके 'श्यामची आई'चं दिग्दर्शन करत आहे. कोकणात 'श्यामची आई'चं पहिलं शेड्यूल यशस्वीपणे पार पडल्यानंतर पन्हाळ्यामध्येही दुसरं आणि महत्त्वपूर्ण शेड्यूल पूर्ण करण्यात आलं आहे. यानंतर आता अशोक पत्कींसारखे मेलोडीचे पुरस्कर्ते असणारे संगीतकार या सिनेमाच्या टिममध्ये सहभागी झाल्यानं गीत-संगीताची बाजूही श्रवणीय होणार याची खात्री पटली आहे. जिंगल्सचे बादशहा अशी ओळख असणाऱ्या पत्की यांनी आजवर बऱ्याच सिनेमांसोबतच नाटक आणि मालिकांनाही संगीत दिलं आहे. आता 'श्यामची आई'च्या रूपात त्यांच्याकडे महत्त्वपूर्ण कामगिरी सोपवण्यात आली आहे. या सिनेमात एकूण तीन गाणी असणार आहेत. ही गाणी कोणत्या गायकांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात येणार आहेत या रहस्यावरून अद्याप तरी पडदा उठलेला नाही. लवकरच याबाबतची माहितीही जाहीर करण्यात येणार आहे.
मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा 'श्यामची आई'
'श्यामची आई'ला संगीत देण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याबद्दल पत्की म्हणाले की, 'श्यामची आई' हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन आहे. साने गुरुजींच्या विचारांचं द्योतक असणाऱ्या या सिनेमातील गाणीही अतिशय अर्थपूर्ण आहेत. त्यातील भाव ओळखून तो संगीताच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची संगीतकार या नात्यानं माझ्यावर आहे. ही गाणी संगीत क्षेत्रातील आघाडीच्या गायकांच्या आवाजात रसिकांना ऐकायला मिळणार असल्याचंही पत्की यांनी स्पष्ट केलं. अशोक पत्कींसारख्या ज्येष्ठ संगीत दिग्दर्शकाकडून 'श्यामची आई'चं संगीत करून घेण्याबाबत दिग्दर्शक सुजय डहाके म्हणाला की, या सिनेमाला संगीताच्या माध्यमातूनही उचित न्याय देण्यासाठी पत्कींसारख्या दिग्गज संगीतकाराची गरज होती आज भारतीय संगीत क्षेत्रात बरेच नामवंत संगीतकार आहेत, पण पत्कींची संगीतशैली सर्वांपेक्षा वेगळी असून, ती 'श्यामची आई'मधील गीतांमधील भाव सर्वांर्धानं रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवू शकेल याची खात्री असल्यानं संगीत दिग्दर्शनासाठी त्यांची निवड केली आहे. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात रसिकांसमोर येणार असल्यानं त्या काळातील संगीताचा बाज 'श्यामची आई'ला लाभावा हेदेखील पत्कींकडे संगीताची जबाबदारी सोपवण्यामागील एक प्रमुख कारण असल्याचं सुजय म्हणाला.