Amitabh Bachchan: सलमाननंतर आता अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ; मिळणार X श्रेणीची सुरक्षा
बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. बिग बींना आता x श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे.
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. आता अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, बिग बींना आता X श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे. काल (2 नोव्हेंबर) अभिनेता सलमान खान आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची देखील सुरक्षा वाढण्यात आली होती.
लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकारांना काही प्रकारचे धोका असतात त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात येते. अमिताभ बच्चन यांना यापूर्वी मुंबई पोलिसांची सामान्य सुरक्षा देण्यात आली होती. पण आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आता त्यांना X श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
24 तास सुरक्षा रक्षक असणार तैनात
X श्रेणी सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक 24 तास तैनात असतात. म्हणजेच आता एक्स ग्रेड सुरक्षेअंतर्गत बिग बी यांच्या सुरक्षेसाठी आणखी 2 गार्ड तैनात केले जातील, त्यापैकी एक पीएसओ आहे. म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी आता 3 पोलीस वेगवेगळ्या शिफ्टमध्ये राहणार आहेत. अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना देखील एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर सलमानला Y+ श्रेणी सुरक्षा मिळाली आहे, ज्यामध्ये 2 कमांडो आणि 2 PSO आणि इतर पोलिसांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट
बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. यामधील ब्रह्मास्त्र या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अमिताभ यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती आणि डॅनी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच अमिताभ बच्चन हे सध्या केबीसी-14 या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या कार्यक्रमाचे बिग बी सूत्रसंचालन करतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: