कोरिओग्राफर गणेश आचार्यचं नवं रुप; घटवलं तब्बल 98 किलो वजन
विनोदवीर कपिल शर्मा याच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली असतानाच गणेश आचार्यनं यासंदर्भातील उलगडा केला. तेव्हा त्याच्या या प्रवासावर प्रतिक्रिया देत कपिलनेही विनोदी फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं
मुंबई : नृत्यदिग्दर्शक अर्थात सेलिब्रिटी कोरिओग्राफर गणेश आचार्य हा त्याच्या नृत्यकौशल्यासोबतच त्याचं व्यक्तीमत्त्वं आणि देहयष्टीमुळंही चर्चेत असायचा. स्थुल असूनही नृत्यकलेत इतरांनाही थकवेल असा त्याचा उत्साह आणि योगदान अगदीच वाखाणण्याजोगं. असा हा कोरिओग्राफर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते म्हणजे त्याच्या नव्या रुपामुळं.
विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात त्यानं हजेरी लावली आणि गणेशला पाहून प्रेक्षकांसमवेत खुद्द कपिललाही आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, गणेश आचार्य यानं तब्बल 98 किलो वजन घटवल्याची माहिती या कार्यक्रमादरम्यान दिली. हे ऐकून कपिलही स्वत:ला रोखू शकला नाही आणि गणेशची वाहवा करत त्यानं या विषयावर विनोदी फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.
‘सोनी’ वाहिनीवरील या कार्यक्रमाचा एक लहानसा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. गणेश आचार्यचं हे रुप सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान इथवर पोहोचण्याचा त्याचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. ‘हिंदुस्तान टाईम्स’नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार याबाबत सांगताना गणेश म्हणालेला, ‘हे माझ्यासाठी अत्यंत कठिण होतं. मी जवळपास दीड वर्षापासून माझ्या शरीरावर काम करत होतो. ‘’हे ब्रो’’ या चित्रपटासाठी मी 30-40 किलो वजन वाढवलं होतं. माझं वजन तेव्हा जवळपास 200 किलोच्या घरात पोहोचलं होतं. आता तेच कमी करतोय’.
वजन कमी करण्याचं आपण ठरवलंच होतं, असं सांगत प्रेक्षकांनी गणेश आचार्यला कायमच वाढलेल्या वजनात, स्थुल रुपात पाहिलं आहे. त्यामुळं मला हीच प्रतिमा बदलायची होती, असंही तो म्हणाला होता. जिद्द, चिकाटी आणि समर्पकता याच्याच बळावर गणेशनं हा प्रवास साध्य करुन दाखवला. ज्याची सर्वच स्तरांतून सध्या प्रशंसा केली जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान, येत्या काळात गणेश ‘देहाती डिस्को’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळं प्रेक्षकांसाठी या चित्रपटाच्या निमित्तानं नव्या गणेशला पाहण्याची संधी मिळेल असं म्हणायला हरकत नाही.