... तर तुम्ही अडचणीत सापडाल; सलमान कोणाला देतोय ताकीद?
त्या एका चुकीमुळं सलमानचा संताप अनावर ...

मुंबई : सहसा बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा चाहत्यांशी असणाऱ्या त्याच्या खास नात्यासाठी ओळखला जातो. पण, आता मात्र याच भाईजान सलामान यानं त्याच्या काही चाहत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे, तर सलमानने थेट चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांना ताकीदही दिली आहे.
ईदच्या निमित्तानं सलमानचा राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ऑनलाईन माध्यमातून यावेळी सलामनाननं चाहत्यांना ही चित्रपटरुपी ईदी दिली. पण, काहींनी मात्र हा चित्रपट पायरसीच्या माध्यमातून पाहिल्याची बाब निदर्शनास आणली गेली आणि हे पाहून सलमाननं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सलमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ट्विट करत पायरसीच्या मार्गाचा वापर करणाऱ्यांना इशारा देत त्यांना यासाठी मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं असा इशारा दिला आहे. यासाठी केलेल्या ट्विटमध्ये त्याने लिहिलं, 'आम्ही राधे पाहण्यासाठी तुमच्याकडून अवघे 249 रुपये आकारत होतो. असं असतानाही पायरसी करणाऱ्या काही संकेतस्थळांवरुन बेकायदेशीर पद्धतीनं राधेचं स्क्रिनिंग करण्यात आलं. सध्या सायबर सेल या सर्वच साईट्सविरोधात कारवाई करत आहे. कृपया पायरसीमध्ये सहभागी होऊ नका, नाहीतर सायबर सेल तुमच्यावरही कारवाई करु शकते. हे लक्षात घ्या असं केल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकता.'
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 15, 2021
दरम्यान, आपल्या चित्रपटाच्या अनुशंगानं सलमाननं सध्या आक्रमक पवित्रा घेतला असला तरीही त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांकडून मात्र फार चांगल्या प्रतिक्रिया मिळताना दिसत नाहीयेत. प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट झीप्लेक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सलमानसोबतच दिशा पटानी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफही झळकत आहेत.























