Anupam Kher : द काश्मीर फाइल्स'ची गोष्ट माझ्यासह अनेक लोकांची, नदाव लॅपिड यांचं वक्तव्य चुकीचं : अनुपम खेर
Anupam Kher : काश्मिरी पंडितांविषयीची जी गोष्ट आम्ही सांगितली आहे, तिला 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' म्हटलं गेलं आहे. परंतु, त्यांचं फार चुकीचे आहे, असं मत अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केलंय.
Anupam Kher : 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटातील गोष्ट फक्त माझीच नाहीये तर माझ्यासारख्या अनेक लोकांची आहे. ज्यांना आपल्या घरातून जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. त्यावेळी अनेक महिलांवर अमानुष अत्याच्यार करण्यात आले. अलीकडेच ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाबाबत एक व्यक्तव्य केलं. परंतु, त्यांचं हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे, असं मत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी व्यक्त केलंय. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अुपम खेर यांनी त्यांच्या करिअरच्या स्ट्रगलविषयी देखील मन मोकळ्या गप्पा मारल्या.
गोव्यात नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (iffi) पार पडला. या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं होतं. तसेच, हा चित्रपट वल्गर आणि प्रपोगंडा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एक नवा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी माझा कट्ट्यावर आपले मत व्यक्त केले.
अनुपम खेर म्हणाले, "काश्मिरी पंडितांविषयीची जी गोष्ट आम्ही सांगितली आहे, तिला 'वल्गर' आणि 'प्रोपगंडा' म्हटलं गेलं आहे. जे फार चुकीचे आहे. कारण ही फक्त माझीच गोष्ट नाहीये तर अनेक लोकांची गोष्ट आहे. ज्यांना 19 जानेवारी 1990 रोजी आपल्या घरातून जबरदस्तीने हाकलून लावण्यात आले. त्याआधी अनेक लोकांची निघृण हत्या करण्यात आली होती. अनेक महिलांवर बलात्कार करण्यात आला होता. 32 वर्ष या घटनेला दडपून ठेवण्यात आले होते. सिनेमाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी हे दु:ख लोकांपर्यंत पोहोचवले. हा किस्सा आपल्या कुटुंबाच्या बाबतीतही घडला आहे. माझे मामा स्वत: या घटनेचे शिकार झाले होते. आंतरराष्ट्रीय मंचावर नदाव यांनी ज्या दोन शब्दाचा वापर केला तो फक्त माझाच नाही तर बऱ्याच लोकांच्या भावनांचा अपमान आहे. त्यांना वेळीच थांबवणे गरचेचे आहे म्हणून मी बोललो." अनुपम खेर यांनी यावेळी आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी देखील सांगितल्या.
कसं होतं बालपण?
बालपणीच्या आठवणीत रमताना अनुपम खेर म्हणाले, "मी गरिबीतून आलो आहे. इथे जेव्हा मी आलो तेव्हा फक्त 36 रूपये घेऊन आलो होतो. आज मी माझा कट्ट्यावर बसून माझ्या आयुष्याबद्दल बोलतोय. आतापर्यंत 532 सिनेमांत मी काम केले आहे. पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे."
गमतीशीर किस्साही सांगितला...
नुपम खेर यांनी यावेळी अनेक मनोरंजक आठवणीही सांगितल्या. ते म्हणाले, माझा पत्ता तरी सांगा, माझे वडील आता विचारतील की आधी तर 32, वालकेश्वर रोड होता. आता काय पत्ता आहे? तर त्याने सांगितलं की मी लिहून देतो. त्याने लिहून दिल्यानंतर जेव्हा मी तो पत्ता वाचला तेव्हा मी थोडा हसलो. माझा पत्ता असा होता, अनुपम खेर 2/15 खेरवाडी, खेरनगर, खेररोड, बांद्रा पूर्व.
नेमकं काय होतं प्रकरण?
ज्युरीने 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या समारंभात एकच गोंधळ उडाला. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी सांगितले की, महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी या चित्रपटाला 'प्रपोगंडा आणि वल्गर' म्हटलं आहे. नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' हा प्रपोगंडा आणि वल्गर असल्याच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, 'खोट्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते.' अनुपम खेर यांनी 'द काश्मीर फाइल्स' मधील त्यांचा फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे. खेर यांच्या या ट्विटला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.