(Source: ECI | ABP NEWS)
‘बाईपण जिंदाबाद’ मालिकेच्या यशानंतर कलर्स मराठी आणतेय एक हृदयस्पर्शी कथा, सुचित्रा बांदेकरसह या कलाकारांची तगडी फौज नव्या रुपात
दोन भिन्न पण तितक्याच प्रेमळ आणि सशक्त आईंची कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

colors marathi serial: मराठी प्रेक्षकांना नेहमीच वास्तवाशी जोडणाऱ्या आणि भावनिक पातळीवर स्पर्श करणाऱ्या कथा सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कलर्स मराठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे मनाला भिडणारी नवी गोष्ट. ‘बाईपण जिंदाबाद’ या मालिकेच्या यशानंतर आता त्याच मालिकेच्या श्रुंखलेतून प्रेक्षकांसमोर येत आहे अजून एक हृदयस्पर्शी कथा,ज्याचं नाव आहे ‘मच्छी का पानी’.
स्त्रीच्या असंख्य रूपांना, तिच्या संघर्षाला आणि तिच्या सामर्थ्याला सलाम करणारी ‘बाईपण जिंदाबाद’ ही मालिका प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याचं वास्तव आणि भावविश्व दाखवणारी ठरली आहे. ‘मच्छीका पानी’मध्येही हाच प्रवाह पुढे नेत दोन भिन्न पण तितक्याच प्रेमळ आणि सशक्त आईंची कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
सुचित्रा बांदेकरसह हे कलाकार नव्या भूमिकेत
या कथेत सुचित्रा बांदेकर साकारत आहे एका करिअर-ड्रिव्हन, स्वतंत्र आणि स्वप्नाळू आईची भूमिका. तिचं ध्येय आहे आपल्या वडिलांच्या आयकॉनिक हॉटेलचं पुनरुज्जीवन करणे, आणि हे स्वप्न ती आपल्या मुलाने पूर्ण करावं अशी तिची मनापासूनची इच्छा आहे. तिचा मुलगा, ज्याची भूमिका तेजस बर्वे करतो आहे, स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, पण आईच्या अपेक्षांच्या सावलीत अडकलेला आहे.
दुसऱ्या बाजूला, शलाका पवार दिसणार आहे एका उत्साही, मनमोकळ्या आणि दृढनिश्चयी कोळी स्त्रीच्या भूमिकेत. समुद्राच्या लाटांसारखं तिचं मनही विशाल आणि प्रामाणिक आहे. ती आपल्या मुलाने पारंपरिक मच्छीमार व्यवसाय पुढे न्यावा अशी अपेक्षा बाळगते, आणि त्याने ‘फूड इन्फ्लुएन्सर’ बनू नये, असं तिला वाटतं.
अपेक्षा, गैरसमज, संघर्ष आणि समजुतींचा प्रवास
दोन भिन्न जगांतील या दोन आई जेव्हा ‘आईपण’ नव्याने समजू लागतात, तेव्हा त्यांच्या भावनांची खरी कसोटी लागते. एकीकडे शहरी आईचं महत्त्वाकांक्षी जग आणि दुसरीकडे किनाऱ्यावरचं साधं पण मनापासून जगणं या दोन नात्यांच्या संघर्षातून उलगडते ‘मच्छीका पानी’ ही गोष्ट.या प्रवासातून ‘प्रेम म्हणजे जपणं नव्हे, तर स्वीकारणं’ ही जाणीव दोघींनाही होते. आई आणि मुलामधील अपेक्षा, गैरसमज, संघर्ष आणि समजुतींचा हा प्रवास प्रेक्षकांना भावनिक सफरीवर घेऊन जाणार आहे.ही गोष्ट शिकवते की “आई असणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर योग्य वेळी पंख पसरू देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. काय घडणार या कथेत पुढे जाणून घेण्यासाठी ‘बाईपण जिंदाबाद! मच्छी का पानी’ रविवार, 2 नोव्हेंबर, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर प्रक्षकांना पाहता येणार आहे.
























