Avatar Fire and Ash Trailer Released: 2100 कोटींच्या 'अवतार 3'चा धमाकेदार ट्रेलर; पेंडोरावर घोंघावतंय संकट, वरंग जादुई शक्तीनं सगळं उद्ध्वस्त करणार?
Avatar Fire and Ash Trailer Released: जेम्सच्या चित्रपटाचा पहिला भाग 'अवतार' आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' म्हणून प्रदर्शित झाला. आता, त्याच्या तिसऱ्या भागाचं नाव 'अवतार: फायर अँड अॅश' असं ठेवण्यात आलं आहे.

Avatar Fire and Ash Trailer Released: सध्या बॉलिवूड सिनेमांपेक्षा (Bollywood Movie) हॉलिवूडचे सिनेमे (Hollywood Movie) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहेत. हॉलिवूड सिनेमांचं बजेट आणि त्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. बऱ्याचदा हॉलिवूड सिनेमांमध्ये नवनवे प्रयोग केले जातात. अशाच एका लोकप्रिय आणि बिग बजेट सिनेमा म्हणजे, 'अवतार' (Avatar Movie), ज्याची सध्या संपूर्ण जगभर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत, या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल खूप चर्चेत आहे. जेम्स कॅमेरॉन 'अवतार: फायर अँड अॅश' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत, ज्याचं बजेट तब्बल 2100 कोटींचं आहे. 'अवतार' हा जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक. अशातच आता या सिनेमाचा तिसरा पार्ट काय धुमाकूळ घालणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
जेम्सच्या चित्रपटाचा पहिला भाग 'अवतार' आणि दुसरा भाग 'अवतार: द वे ऑफ वॉटर' म्हणून प्रदर्शित झाला. आता, त्याच्या तिसऱ्या भागाचं नाव 'अवतार: फायर अँड अॅश' असं ठेवण्यात आलं आहे. त्याच्या तिसऱ्या सिक्वेलमध्ये पाहण्यासारखं बरंच काही आहे. उत्तम सीन्ससह, VFX चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे चित्रपटाचा प्रत्येक सीन धमाकेदा बनतो. 'अवतार'चा ट्रेलर म्हणजे, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा उत्तम नमुना. प्रत्येक सीनपासून ते अगदी बारीक-सारीक डिटेल्सपर्यंत सगळं काही धमाकेदार आहे.
'अवतार 3'मध्ये काय असेल खास?
जेम्स कॅमरूनची फिल्म 'अवतार 3'च्या ट्रेलरमध्ये पेंडोराचं सुंदर जग दाखवण्यात आलं आहे. जिथे वेगवेगळे सजीव एकत्र येऊन गुण्यागोविंदानं राहतात. पण, त्यांचा आनंद फार काळ टिकत नाही. काही वेळातच युद्ध सुरू होतं. त्यांच्या पेंडोरावर हल्ला होतो. जेक सुली आणि त्याचं अख्खं कुटुंब दुसऱ्या कुटुंबाशी लढताना दाखवण्यात आलं आहे.
ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेक सुली आणि त्याची फॅमिली मेटकेयना आपल्या कुटुंबासोबत एकत्र वरंग आणि त्याच्या सैन्याला लढा देतात. यामध्ये आणखी एक कमालीची गोष्ट दाखवण्यात आली आहे की, वरंग आणि कर्नल माइल्स क्वारिच एकत्र झाले आहेत. तसेच, वरंगकडे शक्ती देण्यात आली आहे, जी पेंडोराचं जंगल जाळून खाक करण्यासाठी असलेल्या धोक्यांची झलक दाखवते.
दरम्यान, जर आपण 'अवतार 3' च्या रिलीजबद्दल बोललो तर, 2156 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 19 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट एक-दोन भाषांमध्ये नाही तर इंग्रजी आणि हिंदीसह 6 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. हा मोठा बजेटचा चित्रपट तुम्हाला तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड यासारख्या भाषांमध्येही पाहता येईल. चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रचंड कमाई केली होती. अशा परिस्थितीत, त्याचा तिसरा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.























