Ashok Saraf : बॉलिवूडशी तुलना करताना मराठी सिनेसृष्टीबद्दल अशोक सराफ यांनी हे काय म्हटले? जुना व्हिडीओ होतोय व्हायरल...
Ashok Saraf On Marathi Cine Industries : मराठी चित्रपटातील हिरोला चेहराच नसल्याचे मत अशोक सराफ यांनी मांडले. त्यांच्या मुलाखतीची एक क्लिप व्हायरल होत आहे.
Ashok Saraf On Marathi Cine Industries : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी स्थान मिळवले. रंगभूमीपासून सुरू झालेला त्यांच्या अभिनयाचा प्रवास अजूनही सुरू आहे. आजही अशोक सराफ हे मराठी रंगभूमीवर कार्यरत आहेत. अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण जाहीर करण्यात आला. या पुरस्काराच्या घोषणेनंतर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मनापासून आनंद व्यक्त केला. अशोक सराफ यांची एक जुनी व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे. यामध्ये अशोक सराफ मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील फरक सांगत आहेत.
अशोक सराफ यांनी काही वर्षांपूर्वी 'डीडी सह्याद्री' वाहिनीला मुलाखत दिली होती. यामध्ये अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीत हिरोला चेहरा नसल्याचे त्यांनी म्हटले. अशोक सराफ यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले की, मराठी हिरोला चेहरा नाही. पण हिरोला काम आहे, अॅक्टिंग आहे. हिंदीत मात्र, हिरोला चेहरा आहे. त्याच्या कामाच्या आधी त्याचा पहिल्यांदा चेहरा पाहतात, मग काम पाहतात. याउलट परिस्थिती मराठीत आहे. मराठीत काम आहे. तुम्ही अॅक्टिंग कसे करता, हे पाहिले जाते तुम्ही कसे दिसता याला कोणी महत्त्व देत नाही. तर, तुम्ही कसे काम करता याकडे मराठी प्रेक्षकाचा भर असतो. तुम्ही काय करता याला महत्त्व, हे पूर्वपार चालत आलेला नियम असल्याचे अशोक सराफ यांनी म्हटले.
View this post on Instagram
अशोक सराफांनी मने जिंकली...
आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकांचं व्यासपीठ, टीव्हीची स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णझळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे,तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशी अशोक सराफ यांचं वर्णन केलं जातं. अशोक सराफ यांनी माध्यमांचे जवळपास सर्वच प्लॅटफॉर्म भारावून टाकले.
अष्टपैलू अभिनेता...
पांडू हवालदार, राम गंगराम, आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच,आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला,गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी, वजीर, चौकट राजा, या अशोक सराफ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. कोयला, सिंघम, करण अर्जुन यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केलं. मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील अशोक सराफ यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.'मी बहुरुपी’ या पुस्तकात अशोक सराफ यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे.