BE Rojgaar : तीन बेरोजगारांची गोष्ट; ‘BE Rojgaar’ चा पहिला एपिसोड पाहिलात?
ही कथा आहे भाडिपाच्या नवीन वेबसिरीज ‘B.E.Rojgaar’ची.
BE Rojgaar : पापड्या, पियु आणि अक्षय हे तीन बेरोजगार इंजिनिअर करियरची एक वेगळी वाट निवडतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. ही कथा आहे भाडिपाच्या नवीन वेबसिरीज ‘B.E.Rojgaar’ची. पुणे आणि इचलकरंजी येथे शूट झालेल्या या वेबसिरीजचा पहिला भाग नुकताच भाडिपाच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. तो तुम्ही अगदी फुकटात पाहू शकता. B.E. Rojgaarमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर ही आधी कधीही न पाहिलेल्या, आगळ्या वेगळ्या भूमिकेतून आपल्याला दिसणार आहे. कामाच्या शोधत असलेली विदर्भातन आलेली मेकॅनिकल इंजिनीअरचं 'पियु' पात्र सई साकारत आहे. तिच्यासोबत आपल्याला कोल्हापूरी भूमिका सहजरीत्या साकारणारा संभाजी ससाणे ‘पापड्या’च्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत स्मार्ट आणि तितकंच गुंतागुंतीचं ‘अक्षय’ हे पात्र साकारताना जगदीश कन्नम दिसतोय. तीन इंजिनिअरची आयुष्यात दिशा शोधण्यासाठीच्या धडपडीची ही चित्तवेधक कथा आहे.
लेखक सौरभ शामराज आणि दिग्दर्शक सारंग साठये यांनी भाडिपाची वास्तववादी सिरीज बनवण्याची विशेष शैली इथे पण तशीच सांभाळली आहे. पात्र, लोकेशन आणि घटना सगळेच अतिशय वास्तववादी आहे. एक स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या सारंग साठये याचं विनोदी काम अधिक प्रचलित आहे, मात्र या सिरीजमध्ये हलके क्षण तितक्याच खुबिनं टिपूनदेखील कथानकाचे आणि पात्रांचे गांभीर्य कमी झालेल नाही. या सहा भागांच्या सिरीजचा दर शुक्रवारी एक एपिसोड प्रदर्शित होईल.
बेरोजगाऱ्यांची एक वेगळी बाज आणि अभियंत्यांचा संघर्ष या सीरमजमधून आपण पाहणार आहोत. भाडीपाच्या ही तीन मित्रांची प्रेरणादायी कहाणी प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरेल.
“B.E. Rojgaarने मला वास्तवाचा एक नवीन आयाम दाखवला. ऑनलाइन कॉटेंन्टमध्ये, आणि खास करून मराठीमध्ये वेगळ्या बाजाचा कॉटेन्ट आणण्यामध्ये भाडिपा आघाडीवर आहे. परफॉर्म करताना आपल्या हसवणारी भूमिका साकारताना नेहमीच मजा येते. विदर्भातील माझ्या चाहत्यांना खुष करण्याचा हा माझा धाडसी आणि प्रामाणिक प्रयत्न आहे. सगळे भाग प्रदर्शित झाल्यावर ते बिज वॉच करण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मला खात्री आहे की सगळ्यांना B.E. Rojgaar खुप आवडणार आहे.” - सई ताम्हणकर (पियु)
“भाडिपा सोबत काम करायची कोणाची इच्छा नसते? या सीरिजसाठी भाडिपाने मला निवडलं. ही सीरिज माझ्या करिअरला नवीन वळण देणारी ठरली. सई आणि संभाजी ह्यांनी मला सांभाळून घेतलं, सारंगनी मला अविस्मरणीय अनुभव दिलाय, तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. ही सीरिज पूर्ण होण्यामागे भाडिपाची पूर्ण टीम आहे, त्यांच्याकडून सतत एक ऊर्जा मिळते, आयुष्यभर मला भाडिपा सोबत काम करायला आवडल!” – जगदीश कन्नम (अक्षय)
“अप्रतिम कलाकार आणि निर्मात्यांसोबत काम करण्याचा हा अनुभव मी कायम जपुन ठेवेन. तुम्हाला प्रेरणा देणारी पात्र साकारणं हे एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी खुप इंटरेस्टिंग आहे. ‘पापड्या’ हा माझ्यातील अभिनेत्यासाठी अनोखा प्रवास होता. आमची ही सिरीज 3 इंजिनिअर मुलांच्या आशा आकांक्षांची गोष्ट आहे, ज्यांचं स्वप्न आहे त्यांची स्वतःची कंपनी सरू करणं. मी पापड्याची भूमिका साकारतोय, जो वडा आणि अक्षय या त्याच्या मित्रांना त्यांच्या स्ट्रगलमध्ये मदत करण्यासाठी सतत जुगाड करत असतो. त्यांच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासात त्यांना अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. मला वाटतं कुठल्याही शाखेतील विद्यार्थी या 3 मित्रांच्या स्वप्नांसोबत रिलेट करू शकतात. प्रत्येक तरुण या गोष्टीशी स्वतःला रिलेट करू शकतो. तुम्हाला तुमच्या आजबाजू ला वडा, पिया आणि अक्षय दिसतील.”- संभाजी ससाणे (पापड्या)
“हा शो माझ्यातील ‘स्पिरिट’ दाखवतो जे मला माझ्या वडिलांकडून मिळालं. ते स्वतः इंजिनिअर होते आणि त्यांनी मला शिकवलं की भूतकाळातील चुकांचा विचारकरू नका. हा शो तीन बेरोजगार अभियंता मित्रांबद्दल आहे, जे हार मानत नाहीत. ही स्वप्नांची आणि रिवर्स मायग्रेशनची कथा आहे.” - सारंग साठये (शो क्रिएटर)
संबंधित बातम्या