कुरघोडी, कावा अन् मंबाजीची नांगी..अजय पूरकरचा खलनायकी अंदाज! ‘अभंग तुकाराम’मध्ये चाहत्यांसाठी वेगळाच ट्विस्ट
या भव्य चित्रपटात तुकारामांच्या भूमिकेबरोबरच मंबाजीचं पात्रही कथानकाला एक गडद आणि प्रभावी वळण देणार आहे. अजय पूरकर यांच्या या नव्या अवताराकडे प्रेक्षकांची उत्सुक नजर लागली आहे.

Abhang Tukaram: नायकाइतकाच प्रभावी ठरलेला खलनायक, हा मराठी सिनेमातला एक महत्त्वाचा पैलू. नेहमी प्रेक्षकांच्या मनात आपुलकी निर्माण करणारे आणि साधेपणाने अभिनय करणारे अजय पूरकर आता एका हटके भूमिकेत दिसणार आहेत. ‘अभंग तुकाराम’ या बहुचर्चित चित्रपटात ते पहिल्यांदाच खलनायकाच्या रुपात झळकणार असून, त्यांचा हा नवा अंदाज सिनेरसिकांसाठी एक वेगळी ट्रीट ठरणार आहे. (Marathi Movie)
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘पॅनोरमा स्टुडिओज’ प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक, तर सहनिर्माते मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी आहेत.
संत तुकारामांची लोकप्रियता, मंबाजीच्या कुरघोड्या
या चित्रपटात पूरकर ‘मंबाजी’ या नकारात्मक पात्रात दिसतील. संत तुकोबांची वाढती कीर्ती आणि लोकांमधील लोकप्रियता पाहून मंबाजी अस्वस्थ होतो, आणि त्यातूनच सुरू होतो विरोध, चिडचिड आणि कुरघोड्यांचा खेळ. बहिणाबाईंच्या कवितांमध्येही त्याचं वर्णन “विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी” असं केलं आहे.
‘मंबाजी’ या आपल्या खलनायकी भूमिकेबद्दल बोलताना अजय पूरकर सांगतात, ‘याआधीच्या माझ्या बऱ्याच भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या. आजवरच्या माझ्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन एक वेगळा प्रयत्न या चित्रपटातून मी केला आहे. ही व्यक्तिरेखा कमाल ताकदीची आहे. कलाकार म्हणून स्वीकारलेली ही व्यक्तिरेखा मला खूप महत्त्वाची वाटते. कलाकार म्हणून माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी वेगळेपण कसं आणू शकतो हे महत्त्वाचं आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील या भूमिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली.
मंबाजीचं पात्र कथानकाला प्रभावी वळण देणार
चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. ध्वनी आरेखन निखिल लांजेकर, हिमांशू आंबेकर यांचे आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत. नृत्यदिग्दर्शन सुमित साळुंखे तर कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, संजय करोले यांचे आहे. निर्मिती पश्चात प्रक्रिया सचिन भिल्लारे यांची आहे. व्ही एफ. एक्स ची जबाबदारी शॉक अँड ऑ फिल्म्स यांनी तर व्हिजुअल प्रमोशनची जबाबदारी कॅटलिस्ट क्रिएटस यांनी सांभाळली आहे. सिनेमन एंटरटेनमेंटचे जय गोटेचा मार्केटिंग डायरेक्टर आहेत. कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत. या भव्य चित्रपटात तुकारामांच्या भूमिकेबरोबरच मंबाजीचं पात्रही कथानकाला एक गडद आणि प्रभावी वळण देणार आहे. अजय पूरकर यांच्या या नव्या अवताराकडे प्रेक्षकांची उत्सुक नजर लागली आहे.
























