Actress Daya Dongre Passed Away: अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन; मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील प्रतिभाशाली चेहरा काळाच्या पडद्याआड
‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘लेकुरे उदंड जाली’ यांसारख्या अनेक लोकप्रिय नाटकांतून प्रेक्षकांची मने जिंकली.

Actress Daya Dongre Passed Away: मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक मानाचं नाव असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे (Daya Dongre) यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं आहे. वृद्धापकाळामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ‘मायबाप’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ आणि ‘उंबरठा’ यांसारख्या उल्लेखनीय चित्रपटांमधील त्यांच्या दमदार भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. (Marathi Entertainment)
रंगभूमीसह अभिनयाची कारकीर्द
कारकिर्दीच्या सुरुवातीला दया डोंगरे यांचा कल संगीत क्षेत्राकडे होता. आकाशवाणी गायन स्पर्धेत त्यांनी उत्तम यश मिळवत आपली ओळख निर्माण केली होती. मात्र पुढे अभिनयाची ओढ अधिक असल्याने त्यांनी रंगभूमीकडे वळण घेतलं आणि तिथे त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनयाचं बाळकडू त्यांना त्यांच्या आई, अभिनेत्री यमुताई मोडक यांच्याकडून आणि आत्या, गायिका-अभिनेत्री शांता मोडक यांच्याकडून मिळालं होतं. केवळ 16 व्या वर्षी मो. ग. रांगणेकर यांच्या ‘रंभा’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि पहिल्याच भूमिकेत त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं.
11 मार्च 1940 रोजी अमरावती येथे जन्मलेल्या दया डोंगरे यांनी बालपणाचा काही काळ कर्नाटकातील धारवाड येथे व्यतीत केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनयाचं शास्त्रोक्त शिक्षण घेण्यासाठी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला होता. मात्र विवाहानंतर त्यांचं शिक्षण अपूर्ण राहिलं. तरीही पती शेखर डोंगरे यांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा अभिनय प्रवास अखंड सुरू राहिला.
या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या
त्यांनी ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘लेकुरे उदंड जाली’ यांसारख्या अनेक लोकप्रिय नाटकांतून प्रेक्षकांची मने जिंकली. नंतर दूरदर्शन आणि चित्रपटसृष्टीतही त्यांनी तितकीच यशस्वी कारकीर्द घडवली. ‘मायबाप’, ‘आत्मविश्वास’, ‘नवी मिळे नवऱ्याला’, ‘उंबरठा’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अभिनयातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता, तसेच 2019 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या दीर्घ कारकिर्दीचा गौरव करण्यात आला.दया डोंगरे यांनी संगीत, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांतून आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने मराठी अभिनय क्षेत्राने एक संवेदनशील, सरळ आणि असामान्य प्रतिभा गमावली आहे.























