प्रसिद्ध अभिनेत्यानं जग सोडलं, आजारानं आयुष्य हिरावलं; 61व्या वर्षी अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा
Actor Mohan Raj Passes Away: मोहन राज यांनी 1989 मध्ये आलेल्या 'कीरीदम' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. याआधी ते केंद्र सरकारमध्ये अधिकारी होते.
Actor Mohan Raj Passes Away: सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मल्याळम (Malayalam) अभिनेते मोहन राज (Mohan Raj) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. प्रसिद्ध अभिनेते मोहन राज यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोहन राज गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक म्हणून मोहन राज यांना ओळखलं जायचं.
मोहन राज यांनी 1989 मध्ये आलेल्या 'कीरीदम' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. याआधी ते केंद्र सरकारमध्ये अधिकारी होते. या चित्रपटातील त्यांच्या पात्राचं स्क्रीनवरील नाव कीरिकदन जोस होतं, ज्यामुळे त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीत सर्वजण कीरिकदन जोस म्हणूनच ओळखायचे.हळूहळू त्यांच्या कऱ्या नावाऐवजी सर्वजण त्यांना कीरिकदन जोस म्हणूनच ओळखू लागले. या चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत होते.
300 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकले
'कीरीदम' चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर, राज उर्फ जोस यांची लोकप्रियता गगनाला भिडली आणि त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा आवाज आणि चेहऱ्यावरील हावभावांमुळे मोहन राज यांना दक्षिण भारतीय चित्रपटांमधील खलनायकाच्या भूमिकेला एका नव्या उंचीवर नेण्यास मदत झाली. काही वर्षांपूर्वी एका तेलुगू चित्रपटातील स्टंट सीन करताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर ते पूर्णपणे बरे होऊ शकले नाहीत. त्यांची ही दुखापत त्यांच्यासोबत आयुष्यभरासाठी राहिली.
'रोर्शच'मोहन राज यांचा अखेरचा चित्रपट ठरला...
मल्याळम अभिनेते मोहन राज यांनी 2022 मध्ये आपल्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट केला होता. 2022 मध्ये आलेला मामूटी यांच्या 'रोर्शच'चित्रपटात त्यांना अखेरचं पाहिलं गेलं. त्यानंतर प्रकृती अस्वास्थामुळे ते रुपेरी पडद्यापासून दूर राहिले. मोहन राज यांच्या खलनायकाच्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. मोहन राज 'कीरीदम' व्यतिरिक्त 'मिमिक्स परेड' (1991), 'उप्पुकंदम ब्रदर्स' (1993), 'हिटलर' (1996) आणि 'मायावी' (2007) यांसारख्या चित्रपटांमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता. मोहन राज तीन दशके उद्योगक्षेत्रात सक्रिय राहिले. अभिनेत्याच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :