(Source: Poll of Polls)
Aadesh Bandekar : 'शेवटी मला सिद्धीविनायकला उत्तर द्यायचंय', न्यास समितीचं अध्यक्षपद गेल्यानंतर आदेश बांदेकर पहिल्यांदाच झाले व्यक्त
Aadesh Bandekar : शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी सिद्धीविनायक न्यास समितीचं अध्यक्षपद गेल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Aadesh Bandekar : सिद्धीविनायक न्यास समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली. आदेश बांदेकरांनी (Aadesh Bandekar) सिद्धीविनायकाच्या न्यास समितीच्या अध्यक्षपदाची धुरा मागील अनेक वर्षांपासून सांभाळली. परंतु कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचं अध्यक्षपद गेलं ते गेलंच. आदेश बांदेकर अध्यक्षपदी असताना त्यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले. दरम्यान या सगळ्यावर आदेश बांदेकर हे पहिल्यांदाच व्यक्त झालेत.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखती दरम्यान आदेश बांदेकर यांनी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाविषयी देखील सांगितलं. सदा सरवणकर यांची वर्णी लागल्यानंतर ठाकरे गटाकडून विरोध दर्शवण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सदा सरवणकर यांच्या नियुक्तीवरही नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यावेळी आदेश बांदेकर यांच्यावर भाजपवकडून टीका करण्यात आली होती. त्या सगळ्यावर आता आदेश बांदेकर हे व्यक्त झाले आहेत.
मला सिद्धीविनायकाला उत्तर द्यायचं आहे - आदेश बांदेकर
आपण अध्यात्म मानतो. मी पत्रकार परिषद घेतली तेव्हाही सांगितलं होतं की, 'शेवटी मला सिद्धीविनायकाला उत्तर द्यायचं आहे.मी सहा वर्ष सिद्धीविनायकाचा अध्यक्ष होतो. माझं एकही वावचर मंदिरात नाहीये. मी एक लाडू जरी मंदिरातून घेतला तरी त्याचे पैसे दिलेले आहेत. त्याचा सगळा रेकॉर्ड आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीमध्ये काम करताना मला राज्यमंत्रीपदाचा दर्जा होता. ज्या दिवशी मला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला, त्या दिवशी मी विधीन्याय विभागाला पत्र दिलं आहे, की कुठलाही भत्ता घेणार नाही आणि मी तो घेतलाही नाही.'
तिथल्या प्रत्येक रुपयाचं मोल आहे - आदेश बांदेकर
पुढे बोलताना आदेश बांदेकर यांनी म्हटलं की, 'अशा देवस्थानांमध्ये काम करायला मिळणं हीच आईवडिलांची पुण्याई असते, असं मला वाटतं. जेव्हा आपण तिथे काम करतो, तेव्हा तिथे येणारा भाविक, त्याने दानपेटीत टाकलेल्या एक एक रुपयाचं मोल असतं. त्यामुळे मला सिद्धीविनायकाची सेवा करायला मिळाली हीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा वैद्यकीय मदतीची चेक मी सही करुन द्यायचो आणि ते पैसे मिळाल्यानंतर ती माऊली ती मदत डोक्याला लावायची, तेव्हा असं वाटायचं तो पावला म्हणून. त्यामुळे तिथल्या रुपयाचंही मोल आहे आणि तिथे चुकीचा विचार मनात येईलच कसा. तो विचार कोणाच्याच मनात नाही येऊ शकत. मला खूप आनंद आहे, की मी त्याची उत्तम सेवा केली.'