(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad : 11 लाखांची पैठणी पटकावण्याचा ध्यास! तहान भूक हरपून औरंगाबादच्या ‘वहिनीं’ची ऑडिशनसाठी भलीमोठी रांग!
Maha Minister : महामिनिस्टरसाठी महाराष्ट्रभर ऑडिशन सुरु आहेत. या ऑडिशनसाठी महिलावर्गात सध्या जल्लोष आणि उत्सुकता पाहायला मिळतेय. आज (22 एप्रिल) या शोचे ऑडिशन औरंगाबादमध्ये पार पडत आहे.
Maha Minister : ‘दार उघड वहिनी.. दार उघड’ म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील वहिनींना मानाची ‘पैठणी’ देण्याचा ‘होम मिनिस्टर’चा (Home Minister) हा खेळ गेली 18 अविरत सुरु आहे. ‘झी मराठी’च्या या शोने महाराष्ट्रचं नव्हे, तर देशभरातील ‘स्त्री’शक्तीचा सन्मान केला आहे. आता या शोचं नवं पर्व अर्थात ‘महामिनिस्टर’ (Maha Minister) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या महामिनिस्टरसाठी महाराष्ट्रभर ऑडिशन सुरु आहेत. या ऑडिशनसाठी महिलावर्गात सध्या जल्लोष आणि उत्सुकता पाहायला मिळतेय. आज (22 एप्रिल) या शोचे ऑडिशन औरंगाबादमध्ये पार पडत आहे.
ऑडिशनच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये चक्क दीड-दोन किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळाल्या आहे. तहान भूक विसरून ऑडिशनच्या रांगेत उभ्या असणाऱ्या या महिला वर्गाला उन्हाच्या झळांचा देखील विसर पडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या खेळाची पहिली फेरी पार पडत आहे. स्पर्धक हजारोंच्या संख्येने असले, तरी यातून केवळ 100 महिलांचीच निवड होणार आहे.
कसं असणार यंदाचं पर्व?
यावेळी ‘होम मिनिस्टर’चं हे नवं खूप खास असणार आहे. वहिनींच्या घरी जाणारे आदेश भावोजी यंदा महाराष्ट्रातील 9 ऑडिशन सेंटर्समध्ये हा खेळ आयोजित करणार आहेत. यात प्रत्येक सेंटरवर ऑडिशन घेऊन त्यातून 100 महिलांची निवड केली जाईल. या 100 महिलांसोबत सोमवार ते रविवार, या एका आठवड्यात अनेक खेळ खेळले जातील. यातील एकीची निवड या ‘सेंटरची विजेती’ म्हणून होईल. 100 महिलांमधून विजयी ठरलेल्या महिलेला सव्वा लाखांची पैठणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. यानंतर एकूण 9 सेन्टर्सच्या विजेत्यांसोबत या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. यात विजेती ठरणाऱ्या वहिनीस तब्बल 11 लाखांची सोन्याचे वर्क असलेली पैठणी मिळणार आहे.
बहुचर्चित 11 लाखांची पैठणी एकच असली, तरी या खेळत सहभागी होण्यासाठीचा उत्साह संपूर्ण महिला वर्गात पाहायला मिळतो आहे. ऑडिशन सेंटरवर महिलामंडळाने एकच गर्दी केली आहे.
खास कारागिरांनी तयार केलीये मानाची पैठणी!
‘सोन्याची जर आणि हिरे जडवलेली 11 लाखांची पैठणी ही येवलेमध्ये बनतेय आणि ही पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख असली, तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय, हा चांगला उद्देश आहे. या पैठणीपेक्षा हे कारागिरांचा आणि विजेत्या वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे’, असे आदेश बांदेकर म्हणाले.
हेही वाचा :
- KGF 2 : हिरो बनायला आला अन् डबिंग आर्टिस्ट म्हणून गाजला! वाचा ‘रॉकी भाई’ला आवाज देणाऱ्या ‘त्या’ मराठमोळ्या व्यक्तीबद्दल...
- Mukta Barve : ‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’, अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत!
- रंगभूमीवरील ऐतिहासिक सुवर्ण पान, ‘रायगडा’वरच रंगला ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ नाटकाचा दमदार प्रयोग!